वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतात ११.४ टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, तर ३५.५ टक्के लोकांना उच्च रक्तदाब आहे. १५.३ टक्के लोक मधुमेह होण्याच्या रेषेवर आहेत. ‘लॅन्सेट डायबिटीज अँड एंडोक्रिनोलॉजी जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.देशातील मधुमेह आणि असंसर्गजन्य रोगांवरील (एनसीडी) सर्वांत मोठ्या अभ्यासात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, की सन २०२१मध्ये भारतातील १० कोटी दहा लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे, तर १३ कोटी ६० लाख लोक मधुमेह होण्याच्या रेषेवर असण्याची शक्यता आहे. त्याच वेळी ३१ कोटी ५० लाख लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने ‘मद्रास डायबिटीज रीसर्च फाउंडेशन’ने (एमडीआरएफ) हा अभ्यास केला. यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिला होता. भारतातील २८.६ टक्के लोक सामान्य लठ्ठपणाने ग्रस्त आहेत, तर ३९.५ टक्के लोक ढेरपोटेपणाने ग्रस्त आहेत. सन २०१७मध्ये भारतातील सुमारे ७.५ टक्के लोकांना मधुमेह असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. म्हणजेच तेव्हापासून आतापर्यंत ही संख्या ५० टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

राज्यांमध्ये गोव्यात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण (२६.४ टक्के) आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वांत कमी रुग्ण आहेत (४.८ टक्के). पंजाबमध्ये उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे (५१.८ टक्के).

बिगरसंसर्गजन्य आजारांमध्ये झपाट्याने होणारी वाढ हे मुख्यतः जीवनशैलीतील बदल जसे आहार, शारीरिक हालचाल आणि तणावाच्या पातळीमुळे असू शकते, असे ‘एमडीआरएफ’चे अध्यक्ष डॉ. आर. एम. अंजना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

हा अभ्यास सन २००८ ते २०२०दरम्यान देशातील ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एक लाख १३ हजार ४३ लोकांवर करण्यात आला. यापैकी ३३ हजार ५३७ शहरी आणि ७९ हजार ५०६ ग्रामीण भागातील रहिवासी होते.अभ्यास पथकात नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) संशोधकांचाही समावेश होता.

‘… तर चार लाख मृत्यू टाळता येतील’

नवी दिल्ली : ‘जल जीवन मिशन’ने सर्व ग्रामीण कुटुंबांना शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट साध्य केले, तर अतिसारामुळे होणारे सुमारे चार लाख मृत्यू रोखले जाऊ शकतात, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. सरकारने सन २०१९मध्ये जल जीवन मिशन सुरू केले होते. या अंतर्गत पुढील वर्षापर्यंत ग्रामीण भागांतील सर्व घरांना नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येणार होते. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने ‘डब्ल्यूएचओ’ला भारतात सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाढवण्याचे आरोग्य फायदे आणि आर्थिक बचतीचा अभ्यास करण्यास सांगितले होते. ‘जलजीवन मिशन’ भारतातील सर्व लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवू शकले, तर अतिसारामुळे होणारे सुमारे चार लाख मृत्यू टाळता येतील, असे या अभ्यासातून समोर आले आहे.
महाराष्ट्राचा पहिला नंबर, गुजरात आणि कर्नाटकलाही मागे टाकलं, शिंदे-फडणवीस सरकारसाठी गुड न्यूज
मधुमेहाचे औषध करोनावर गुणकारी

नवी दिल्ली : करोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीनंतर मधुमेहाचे औषध गुणकारी ठरल्याचे समोर आले आहे. मधुमेहावरील सुरक्षित आणि परवडणारे औषध असलेल्या मेटफॉर्मिनचा दोन आठवड्यांचा कोर्स पूर्ण केल्यानंतरच्या १० महिन्यांत करोनाचा धोका ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे ‘लॅन्सेट’च्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. या अभ्यासासाठी निवडलेले सहभागी हे ३० वर्षांहून अधिक वयाचे होते. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे त्यांना करोनाचा धोका जास्त होता; तसेच गेल्या तीन दिवसांत त्यांची ‘सार्स कोव्ह २’ चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here