म. टा. प्रतिनिधी, पुणे : अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) डॉ. अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (सीबीआय एसीबी) शुक्रवारी अटक केली. डॉ. रामोड यांच्या कार्यालयातून, शासकीय निवासस्थानातून आणि बाणेर येथील बंगल्यातून सीबीआयच्या पथकाने कागदपत्रे; तसेच सहा कोटी रुपये जप्त केले. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप डॉ. रामोड यांच्यावर आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यावर सीबीआयने कारवाई केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात तक्रारदाराकडून आठ लाख रुपये मागितल्याची तक्रार ॲड. याकूब साहेबू तडवी यांनी सीबीआयकडे केली होती. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर सीबीआयने सापळा लावला होता. सीबीआयचे पथक कॅम्प भागातील शासकीय वसाहतीत शुक्रवारी दुपारी दाखल झाले. शासकीय वसाहतीतील रामोड यांच्या निवासस्थानातून सीबीआयच्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातील (कौन्सिल हॉल) रामोड यांच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त करण्यात आली. बाणेर भागातील ऋतूपर्ण सोसायटीतील बंगल्यातून काही कागदपत्रे; तसेच सहा कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सीबीआयच्या पथकाला रक्कम मोजणीसाठी यंत्र मागवावे लागले.

रस्त्यात कार पलटी, ट्रॅफिक जॅम; वसंत मोरेंनी गाडी उचलून थेट डिव्हायडरवरच ठेवली, व्हिडिओ व्हायरल

El Nino : भारतीयांची काळजी वाढवणारी बातमी, एलनिनोचं कमबॅक, मान्सूनवर परिणाम होणार का? चिंता वाढली

सीबीआयच्या पथकाने रामोड यांना विभागीय आयुक्त कार्यालयातून ताब्यात घेतले. सीबीआयचे पथक त्यांना पुण्यातील कार्यालयात घेऊन रवाना झाले. रामोड यांची चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मूळचे नांदेड येथील रामोड दोन वर्षांपासून पुण्यात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

डॉ. अनिल रामोड यांच्यावर सीबीआयने कारवाई केल्याने पुण्यातील महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या इतिहासात सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणेने पहिल्यांदाच छापा टाकल्याने विभागीय आयुक्तालयासह जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारतीमधील उच्चपदस्थ महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. रामोड यांची सायंकाळपर्यंत झाडाझडती सुरू होती. याबाबत उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नसल्याने कारवाईमुळे महसूल खात्यातील अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. सीबीआयच्या पथकाने रामोड यांच्या दालनात छापा टाकल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तालयातून काढता पाय घेतला. या कारवाईत सीबीआयचे आठ ते दहा जणांचे पथक सकाळपासून कार्यरत होते. दुपारनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी थेट दालनातच जेवणाचे डबे मागवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here