अमळनेर शहरातील जिंजरगल्ली, जुना पारधी वाडा आणि सराफ बाजार परिसरात शुक्रवारी रात्री १० वाजता दोन गटांत हाणामारी होऊन जोरदार दगडफेक झाली. व्यापाऱ्यांचा रहिवासी परिसर असल्याने यावेळी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.
दगडफेक करणारे दोन्ही गटातील ३२ तरुण ताब्यात
पोलिसांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर अतिरिक्त कुमक जळगावहून मागवली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी ही भेट देत अधिकार्यांना सूचना करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आदेश केले. आणि संशयितांवर कारवाईच्या सूचना केल्या. यावेळी एलसीबीचे पथकही दाखल झाले होते. या घटनेत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या ३२ तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई सुरू केली असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दंगलीच्या पार्श्वभूमीवर १२ जूनपर्यंत संचारबंदी लागू; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
अमळनेर शहरात रात्री दोन गटात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांनी कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू केली आहे. आज दिनांक १० रोजी सकाळी ११ वाजेपासून ते दि. १२ जून रोजीच्या सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व जनजीवन सुरळीत राहावे या करीता प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी फौजदारी प्रकोया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.