याबाबतची सविस्तर माहिती अशी की, महिंदळे येथे भिकन नरसिंग राजपूत हे वास्तव्यास आहे. बांभोरी ता. एरंडोल येथील सासर असलेली भिकन राजपूत यांची मुलगी ज्योती ही काही महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी माहेरी महिंदळे येथे आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिला मुलगा झाला. बाळ व आई सुखरूप होते. मात्र गेल्या आठवड्यात भयंकर घटना घडली. कुटुंब पहाटेच्या सुमारास साखर झोपेत होते. यावेळी घरात ज्योती आणि तिचे चार महिन्याचे बाळ एकाच खाटेवर झोपलेले होते. पहाटे ५ वाजता अचानक बाळ रडायला लागले म्हणून ज्योती झोपेतून खाडकन जागी झाली. उठल्यावर पाहते तर काय, तिला आपल्या तान्हुल्याच्या अंगावर विळखा घातलेला कोब्रा जातीचा अतिविषारी नाग दिसला. ज्योतीने क्षणाचाही विलंब न करता व जीवाची पर्वा न करता नाग थेट हातात पकडला आणि त्याला बाजूला फेकले.
ज्योतीचा जीव वाचावा म्हणून संपूर्ण गावकऱ्यांचे साकडे
सापाला पकडून फेकत असताना ज्योतीला दंश झाला आणि ती अत्यवस्थ झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने ज्योतीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्रकृती खालावल्याने तेथून पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. सर्प अतिविषारी असल्यामुळे ज्योती हिची मृत्यूची झुंज सुरू होती. ज्योती लवकर बरी व्हावी म्हणून गावातील महिलांनी महादेवाला साकडे घातले. मंदिराचा गाभारा पूर्ण पाण्याने भरला. आणि ज्योतीला वाचवावे…यासाठी देवाकडे प्रार्थना केली.
गावकऱ्यांची प्रार्थना फळाला, ज्योती मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर
सर्प अतिविषारी असल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून ज्योती अत्यवस्थ होती. पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनीही धाडसी मातेचा जीव वाचवा म्हणून तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना सर्प दंशावरील इंजेक्शन तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या व वेळेवर इंजेक्शन उपलब्ध झाल्याने तसेच डॉ. भूषण मगर यांच्या यशस्वी उपचाराने पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेली ज्योती मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आली आहे. आता ज्योतीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ज्योतीने तिच्या बाळाला वाचवण्यासाठी दाखवलेल्या धाडसाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.