कुठे पोहोचले बिपरजॉय चक्रीवादळ
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईपासून ७२० किमी किंवा त्याहून कमी अंतरावर दक्षिण पश्चिमेला हे वादळ पुढे सरकत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे राज्यातल्या अनेक भागांत धुवाधार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असून शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह ४ दिवसांमध्ये राज्याच्या तापमानाचा तडाखा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
मच्छीमारांनाही खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना
खरंतर, वारंवार होणाऱ्या हवामान बदलांचा परिणाम स्थानिक पातळीवरही पाहायला मिळतो. यामुळे सकाळच्या वेळी उष्णतेचा तडाखा आणि घामाच्या धारा पाहायला मिळतात तर संध्याकाळी मात्र पावसाच्या सरी बरसत असल्याचं वातावरण आहे. अशात किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्यामुळे मच्छीमारांनाही खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या किनारी भागात जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असून यामुळे काही भागात कडक हवामान असण्याची शक्यता आहे. तर IMD ने मच्छिमारांसाठी इशारा दिला आहे. अशात राजधानी दिल्लीत मान्सूनचे आगमन होणार असले तरी उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. येत्या काही दिवसांत दिल्लीतील तापमान वाढणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे.
१०, ११ आणि १२ जून रोजी जास्तीत जास्त प्रभाव…
अहमदाबादमधील हवामान विभागाच्या विज्ञान केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या चक्रीवादळामुळे १०, ११ आणि १२ जून रोजी वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ नॉट्स वेगाने वाहू शकतो. वाऱ्याचा वेगही ६५ नॉट्सपर्यंत जाऊ शकतो. चक्रीवादळामुळे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रसह किनारपट्टी भागात हलका पाऊस पडू शकतो. याबाबत सर्व बंदरांना कळविण्यात आले आहे.’