नवी दिल्ली : सुप्रिया सुळे…. संसदरत्न खासदार.. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्र्याचा विषय निघतो तेव्हा आपसुकच सुप्रिया सुळेंचं नावही शर्यतीत येतं. वडील शरद पवारांबरोबर दिल्लीच्या राजकारणात बसवलेला जम हाच फॅक्टर सुप्रिया सुळेंसाठी गेमचेंजर ठरताना दिसतोय. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.

या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीत कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद तयार करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या दोघांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती स्वत: पवार यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळेंचा लुटियंस दिल्लीबाहेर प्रभाव नाही. पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून यायचं झालं तर सुप्रिया सुळे अजित दादांवर अवलंबून आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात सुप्रिया सुळेंपेक्षा अजित दादा वरचढ आहेत. पण कार्यकारी अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंची नियुक्ती करण्याची ३ कारणं आहेत.

NCP समोर पहिलं आव्हान कोणतं? कार्यकारी अध्यक्षपदी निवड होताच प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं…
१. सुप्रिया सुळेंचा स्वभाव

अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा दोघांच्या स्वभावातलाही फरक स्पष्टपणे दिसतो. बिनधास्तपणे जागच्या जागी विषय संपवणारे अजित दादा आणि संयमाने, विचारपूर्वक उत्तर देणाऱ्या सुप्रिया सुळे हा दोघातला फरक आहे. राष्ट्रीय स्तरावर कधी इतर राज्यातल्या पक्षांसोबत चर्चा करायचीय, तर कधी धोरणात्मक निर्णय घ्यायचेत, अशा परिस्थितीत संयमी नेतृत्त्व असावं आणि सुप्रिया सुळेंचं पारडं याचसाठी जड आहे, असंही एक गट सांगतो.

२. संघटनात्मक पकड

युवती, विद्यार्थी, युवक, महिला अशा राष्ट्रवादीच्या प्रत्येक आघाडीवर सुप्रिया सुळेंची पकड आहे. राष्ट्रवादीच्या संरचनात्मक कामांत सुप्रिया सुळे महत्वाची भूमिका पार पाडताना दिसतात. संरचनात्मक यंत्रणेत सक्रिय असल्याने पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका, पक्षाचे मेळावे, पक्षाचे नियोजित कार्यक्रम या सर्वांवर सुप्रिया सुळेंचा प्रभाव दिसतो.

३. दिल्लीत असलेली मान्यता

सुरूवातीपासूनच सुप्रिया सुळेंनी दिल्लीच्या राजकारणात लक्ष घालत वडिलांच्या सावलीत राजकारणाचे धडे घेतले. संसदेत आणि संसदेबाहेर पवारांची लेक म्हणून दिल्लीच्या राजकारणात वावर वाढवल्याने सर्वपक्षीय नेत्यांशी सुप्रिया सुळेंचा संपर्क वाढला. संसदेत ठसा उमटविल्याने संसदेतील राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व हाती आलं. पवारांची लेक म्हणून असलेल्या मान्यतेमुळे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाची मान्यता पक्षाबाहेरही वाढली. त्याचमुळे दिल्ली दरबारी राष्ट्रवादीचं आगामी नेतृत्व म्हणून सुप्रिया सुळेंकडे पाहिलं जातं.

मित्र पक्षांशी संवाद साधणं, आघाडीत सलोखा टिकवणं, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मोर्चेबांधणी अशा अनेक मुद्द्यावर पक्ष अध्यक्ष म्हणून काम करावं लागतं. यासाठी दीर्घ अनुभवाचं संचित लागतं. सुप्रिया सुळेंकडे असलेला जवळपास दोन दशकांचा दिल्लीतल्या राजकारणाचा अनुभव हा राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरू शकतो. शिवाय राष्ट्रवादीतील गटातटाचं राजकारण पाहता पक्षावर मांड पक्की करण्यासाठी शरद पवारांसारख्याच अत्यंत संयमी नेतृत्वाची राष्ट्रवादीला गरज असल्याने सुप्रिया सुळेंचं पारडं जड मानलं जातंय.

Sharad Pawar : शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवलीच! सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here