नाशिक : इगतपुरीच्या बाजारात जाण्यासाठी भर रस्त्यात रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या एका महिलेची रस्त्यातच अचानक प्रसूती झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिला व तिचे बाळ सुरक्षित असून त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्गा वाळू झूगरे रा. वाकडपाडा असे रस्त्यातच प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे.
कुऱ्हाडीने डोक्यात वार, हाताचे बोट निकामी; ग्रामपंचायत सभेत महिला सरपंचावर जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यात असलेल्या वाकडपाडा या ठिकाणावरून दुर्गा झूगरे ही महिला इगतपुरी शहरात बाजार करण्यासाठी येत होती. महामार्गावरच असलेल्या पिंपरी फाटा येथून इगतपुरी शहरात येण्यासाठी रिक्षाची वाट पाहत असताना तिला अचानक जोरात प्रसूती कळा सुरू झाल्या. याच दरम्यान टोलनाक्यावरील रूट पेट्रोलिंग व्हॅन त्या ठिकाणी उभी होती. यानंतर कंट्रोल रूम ऑफिसर समीर चौधरी, गुलाब गवळी आणि चालक नारायण वळकंदे यांनी या महिलेची अवस्था पाहून तिला मदत करण्याचा निर्णय घेतला.

रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णवाहिका पंक्चर; महिलेनं गाडीत दिला बाळाला जन्म

दरम्यान या महिलेला महामार्गावरच प्रसूती कळा सुरू झाल्या आणि असाह्य अशा वेदना होऊ लागल्या होत्या. ही महिला वेदनांनी कासावीस झाली होती. मात्र मदतीपूर्वीच या महिलेने नाशिक – मुंबई महामार्गावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला. यानंतर या रूट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला आणि तिच्या बाळाला पुढील उपचारांकरिता इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले. आई आणि बाळ दोन्हीही सुरक्षित असल्याची माहिती समोर आहे. बाळंतपण सुलभ होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर गर्भवती महिलेची देखील तिच्या घरच्यांकडून विशेष काळजी घेतली जाते. असे असताना इगतपुरी तालुक्यातील पिंपरी फाट्यावर रिक्षाची वाट पाहणाऱ्या महिलेची महामार्गावरच प्रसूती झाली आहे. ही प्रसूती सुलभरित्या झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here