लखनऊ: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणानं त्याच्या प्रेयसीची केली. गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून त्यानं तिचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या त्याच्या घराच्या सेप्टिंक टँकमध्ये लपवला. यानंतर त्यानं पोलीस ठाणं गाठून तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून आरोपी तरुणाला अटक केली आहे.घटना करछना परिसरात घडली आहे. राज केसर चौधरी असं मृत तरुणीचं नाव आहे. ती ३४ वर्षांची होती. आरोपीचं नाव आशिष आहे. आरोपीनं राज केसरचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये लपवला. त्यानंतर त्यावर प्लास्टर केलं. प्रेयसीची हत्या केल्यानंतर चारच दिवसांनी आशिषनं लग्न केलं. राज केसर २४ मेपासून बेपत्ता होती. तेव्हापासून तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. २४ मेपासून राज केसरचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी आशिषशा संपर्क साधला. त्यानं थातूरमातूर उत्तरं देत वेळ मारुन नेली. राज केसर माझ्या घरी आलीच नव्हती, असं आशिष म्हणाला. यानंतर आशिष स्वत: राज केसरच्या कुटुंबियांना घेऊन पोलीस ठाण्यात गेला. त्यानं राज केसर बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. आशिष राज केसरबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत होत्या. त्याचे दावे सतत बदलत होते. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांना त्याच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं. त्यातून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यादरम्यान त्यानं हत्येची कबुली दिली. आशिषचं लग्न २८ मे रोजी होतं. ‘आशिषनं राज केसरकडून बरेच पैसे उकळले होते. त्याच पैशातून तो घर बांधत होता. मात्र राज केसरनं लग्नाचा विषय काढताच आशिषनं तिची हत्या केली,’ असा गंभीर आरोप राज केसरच्या कुटुंबियांनी केला.