माझी आई माझ्यासाठी शक्ती आणि प्रेमाचं प्रतीक होती, अशा भावना अमरुद्दीननं व्यक्त केल्या. ‘१९८९ मध्ये माझ्या वडिलांचं अपघाती निधन झालं. पती निधनानंतरही आई डगमगली नाही. तिनं पाच मुलांचा नीट सांभाळ केला. माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा आई केवळ ३० वर्षांची होती,’ असं अमरुद्दीन म्हणाले.
पती गमावल्यानंतर माझ्या आईनं पुनर्विवाह न करण्याचा निर्णय घेतला. मी आणि माझ्या बहिणी तेव्हा खूप लहान होतो. स्वत:च्या कुटुंबाच्या रक्षणासाठी माझ्या आईनं कायम संघर्ष केला. ती आमच्या कुटुंबाचा कणा होती. ती आमच्यासाठी आई तर होतीच, पण तिनं वडिलांची भूमिकादेखील समर्थपणे पार पडली, अशा भावना अमरुद्दीन यांनी बोलून दाखवल्या.
२०२० मध्ये आई आम्हाला सोडून गेली. मला त्यावर विश्वासच बसत नव्हता. ती आजही आमच्यासोबत आहे असं मला कायम वाटत राहतं. आमच्याकडे तिरुवरुरमध्ये काही जमीन होती. त्यावर तिच्या आठवणीत एक स्मारक उभारण्याचा विचार मनात आला. कुटुंबियांपुढे हा विचार मांडला. त्यांनी लगेचच होकार दिला, असं अमरुद्दीन यांनी सांगितलं.
ताजमहालची प्रतिकृती उभारण्याचं काम ३ जून २०२१ पासून सुरू झालं. २०० पेक्षा अधिक कामगारांनी ८ हजार चौरस फूट जागेत ताजमहालची उभारणी केली. ताजमहालच्या उभारणीसाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. त्यासाठी साडे पाच कोटी रुपयांचा खर्च आला. आई आमच्यासाठी ५-६ कोटी रुपये सोडून गेली होती. आम्हाला तो पैसा नको होता. त्या पैशातून आम्ही आईचं स्मारक बांधलं. हे स्मारक आम्ही एका चॅरिटेबल ट्रस्टला दिलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.