म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ शनिवारी आग्नेय ते पश्चिम दिशेच्या मध्ये मुंबईपासून ६०० किलोमीटर अंतरावर होते. या चक्रीवादळाची तीव्रता अतितीव्र चक्रीवादळ अशी नोंदली गेली. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शनिवारी दिवसभर वारे वाहत होते. मात्र, वाऱ्यांमुळे मुंबईकरांना फारसा दिलासा मिळाला नाही. मुंबईमध्ये उन्हाचे चटके जाणवत होते. सांताक्रूझ येथे ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात जाणावलेल्या तापमानाचा शनिवारी उच्चांक झाला. आत्तापर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार, शनिवारचे सांताक्रूझचे कमाल तापमान हे जूनमधील मुंबईतील सर्वाधिक कमाल तापमान होते.

मुंबईमध्ये शनिवारी सकाळीही अनेकांनी अस्वस्थता अनुभवली. सांताक्रूझ येथे २९.६ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे २९ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा ३ अंशांनी अधिक होते. चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील आर्द्रता खेचून घेतली गेली. परिणामी वातावरण अधिक कोरडे असल्याचीही शनिवारी अनेकांना जाणीव झाली. कुलाबा येथे सकाळी ६९ टक्के, तर सायं. ६३ टक्के आर्द्रता होती. तर सांताक्रूझ येथे सकाळी ५८ टक्के आणि सायं. ४४ टक्के आर्द्रता होती. चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदललेली आहे. वारे दक्षिण दिशेकडून वाहत असल्याने कमाल तापमानामध्ये वाढ होत असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. रविवारीही कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास असू शकेल असा अंदाज आहे. शनिवारी दिवसभर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वारेही होते. मात्र, यामुळे तापमानात फारशी घट झाली नाही. किंबहुना शनिवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमानात सरासरीपेक्षा सहा अंशांनी वाढ झाली होती. सांताक्रूझचे तापमान हे आत्तापर्यंतचे जून महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान असून, याआधी सन २०१४मध्ये ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये पारा फारसा चढा नव्हता. शनिवारी कुलाबा येथे मात्र फारशी तापमानवाढ नव्हती. कुलाबा येथे ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. कुलाबा येथे सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक कमाल तापमान होते. तर डहाणू येथे शनिवारी ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. दुसरा शनिवार असल्याने लोकलमध्ये तुलनेने गर्दी कमी होती. कार्यालयीन सुट्टी असलेल्या अनेक मुंबईकरांनी शनिवारी सुट्टीमुळे उन्हाच्या तडाख्यातून वाचल्याची प्रतिक्रिया नोंदवली.

Monsoon : गुड न्यूज! मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्रात, बिपरजॉय पाकिस्तानकडे सरकणार? पाहा IMDचा अंदाज
शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मुंबईमध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. यंदा वळवाचा पाऊसही अनुभवला नसल्याने मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हलक्या सरीही दिलासा देणाऱ्या ठरत आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारी दिलेल्या अंदाजानुसार हलका पाऊस पडला. तर रविवारी आणि सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. यावेळी विजाही चमकतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट द्या, मगच मृतदेह घेऊन जाणार; वसतिगृहात मुलीच्या हत्येनंतर वडिलांचा आक्रोश

राज्यात दोन दिवसांत मान्सूनची शक्यता

चक्रीवादळाचा प्रवास उत्तर ते ईशान्य दिशेने होत आहे, तशी मान्सूनला चालना मिळाली आहे. शनिवारी मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग व्यापला. तसेच केरळचा उरलेला भाग, कर्नाटकचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग, तसेच देशाच्या ईशान्य भागातही मान्सून दाखल झाला आहे. येत्या ४८ तासांमध्ये कर्नाटकाचा काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग, गोवा तसेच महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
Cyclone Biporjoy : बिपरजॉय वादळ पुढील २४ तासात धोकादायक होणार; महाराष्ट्र-गोव्यात पावसाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here