सातारा तालुक्यातील नागठाणे येथे आयोजित बैलगाडा शर्यतीत गाडीची धडक बसून गाडीचे चाक अंगावरून गेले. त्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघात बिरेंदर सिंग (वय ३२, सध्या रा. बोरगाव, ता. सातारा. मूळ रा. पंजाब) असे त्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नागठाणे येथील यात्रेच्या माळावर जय हनुमान तालीम संघ नागठाणे यांच्या वतीने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत राज्यातून जवळपास २५० गाड्या सहभागी झाल्या होत्या. या शर्यती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बिरेंदर सिंग हा तरुण उपांत्य फेरीच्या शर्यतीदरम्यान सीमारेषेजवळ उभा होता.
यावेळी अतिवेगाने आलेल्या बैलगाडीची सिंग यांच्या तोंडास जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, सिंग हा त्याच ठिकाणी कोसळला. त्याचवेळी गाडीचे चाक त्याच्या तोंडावरून गेले. त्यामुळे सिंग याचा जबडा फाटला. घटनेचे गांभीर्य ओळखून आयोजकांनी रुग्णवाहिकेतून सिंगला नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे नागठाणे-सासपडे रस्त्याची विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून केली. रात्री उशिरापर्यंत बोरगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम चालू होते. तपास बिट अंमलदार हवालदार हणमंत सावंत करीत आहेत.