विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाची हजेरी
यंदा मार्च आणि एप्रिलनंतर भर उन्हाळ्याच्या मेमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यंदा तर नवतपादरम्यानही तापमान ४५ अंशांपर्यंत गेले नाही. रविवारी राज्यात वर्धा येथे सर्वाधिक ४३.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शहरात पारा ४२.६ अंशांवर स्थिरावला. रविवारी संध्याकाळी विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाची हजेरी लागली.
पुढील चार दिवस विदर्भासाठी महत्त्वाचे, वादळी पावसाचा इशारा
नागपुरातही सायंकाळी वादळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, सरी बरसल्या नाहीत. सोमवारपासून पुढील चार दिवस हवामान खात्याने विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या काळात नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, असाही अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.
मान्सूससाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार
बिपरजॉय चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर-ईशान्य दिशेने प्रवास केल्यानंतर आता ते पुढच्या प्रवासाला निघाले आहेत. मात्र, सध्या महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मान्सून रविवारी दक्षिण कोकणात दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. मान्सूनरेषा गोवा ओलांडून रत्नागिरीपर्यंत पोहोचली आहे. मात्र, मान्सूनच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी काही काळ आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.