सदर घटना अकोला शहरातील रेल्वे स्थानकावरील गेट क्रमांक दोनवरील रस्त्यावर घडली. तरूणावर वार करतानाचा संपूर्ण थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असल्याचे समजते. या प्रकरणी अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
अकोला रेल्वे स्थानक गेट क्रमांक दोन कडे जाणाऱ्या रस्त्यावर भांडण सुरु असल्याचा एक वाजताच्या सुमारास रामदास पेठ पोलीस ठाण्यात फोन आला. या माहितीनंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे एक तरुण जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. तसेच दुसरा तरुण हातामध्ये चाकू घेऊन जखमी तरुणाला लाथांनी मारहाण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तरुणावर चाकूने गंभीर वार करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणाजवळील चाकू हिसकावून घेत त्याला ताब्यात घेतले.
राहुल ओंकार त्रिपाठी (वय २७ रा हनुमान चौक, अकोट फैल, अकोला) असं या मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर जखमी तरुणाचे नाव अनिल रताळ (आंबेडकर नगर, अकोला) आहे. पोलिसांनी जखमी अनिलला उपचारासाठी त्वरित अकोला शासकीय रुग्णालयात शासकीय वाहनात पाठवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी अनिलला मृत घोषित केलं. मृत अनिल हा गुन्हेगार होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
लहान भावाला मारहाण केली म्हणून…
पोलिसांनी आरोपी राहुल याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, त्याचा लहान भाऊ महेश ओंकार त्रिपाठी याची मध्यवर्ती बस स्थानकावर चहाचे कॅन्टीन आहे. अनिल रताळ याने २१ मे रोजी कॅन्टीनमध्ये येत चाकू व पाईपने मारून महेशला जखमी केले होते. त्यामुळे त्याच कारणावरुन सूडबुध्दीने आज राहुलने अमर, अभिषेक, सोनु या तिघांना साथीला घेत अनिलची हत्या केली.
रामदास पेठ पोलिसांनी या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी राहुलला ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित तिघे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. अकोट फैल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र कदम आणि छोटू पवार तसेच रामदास पेठ पोलिसांनी या आरोपींना घटनेनंतर ३० मिनिटांमध्येच गजाआड केलं.