: फॅशन शो सुरू होण्यापूर्वी नोएडातील फिल्म सिटीत लायटिंग ट्रस (लोखंडी खांब) कोसळला. या दुर्घटनेत २४ वर्षीय झाला, तर एक तरुण जखमी झाला. यावेळी स्टुडियो परिसरात ३० पेक्षा अधिक जण होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर दुर्घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. मॉडेल वंशिकाच्या मृत्यूप्रकरणी सेक्टर २० पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत मॉडेलचा भाऊ हर्ष चोपडानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी स्टुडिओ मॅनेजर, लायटिंग ट्रस लावणाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्ली एनसीआरसह अन्य ठिकाणांहून जवळपास ३० मॉडेल्ससह इतर काही जण पोहोचले होते. वंशिका तयारीचा आढावा घेत असताना लायटिंग ट्रस कोसळला. त्याखाली दबली गेल्यानं वंशिका जखमी झाली.गंभीर इजा झाल्यानं वंशिकाचा मृत्यू झाला. लायटिंग ट्रस कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कोसळला असता, तर अनेक जण त्याखाली दबले असते. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकली असती. दुर्घटनेवेळी लायटिंग ट्रसच्या खाली मोजकीच माणसं उपस्थित होती. ‘माझ्या बहिणीला फॅशन शोमध्ये प्रमोटरची भूमिका पार पाडण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला. त्यात माझ्या बहिणीचा जीव गेला,’ असा आरोप वंशिकाचा भाऊ हर्ष चोपडानं केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वंशिका चोपडा ग्रेनो वेस्टच्या दिव्यांश फ्लोरा सोसायटीत तिच्या कुटुंबासह भाड्यानं राहत होती. दुर्घटनेची माहिती मिळताच हर्षनं रुग्णालय गाठलं. मात्र डॉक्टरांनी वंशिकाला मृत घोषित केलं होतं. हर्षनं कार्यक्रमाच्या व्यवस्थापकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.