म. टा. प्रतिनिधी, पुणे: पालखी सोहळ्यात अनुचित घटना टाळण्यासाठी आणि भाविकांकडील ऐवज चोरीला जाऊ नये, या दृष्टीने पोलिस वारकऱ्यांच्या वेशात पालखीत सहभागी झाले होते. गुन्हे शाखा आणि विशेष शाखेतील पोलिस कर्मचारी यांनी वारकऱ्यांसारखा वेश करून पालखीवर लक्ष ठेवले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या सोमवारी शहरात दाखल झाल्या. पोलिस आयुक्त रितेशकुमार आणि सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्यातील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी आगमनावेळी अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पालखी मार्गावर ड्रोन आणि ‘सीसीटीव्हीं’ची नजर होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांना दुतर्फा झालेल्या गर्दीतून वाट करून देण्यासाठी पोलिसांनी खास वेगळा बंदोबस्त ठेवला होता. पालख्यांचा मुक्काम आणि पालखी सोहळा मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

वारकऱ्यांचा मेळा पुण्यनगरीत दाखल

हातात भगव्या पताका अन् मुखाने ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा अखंड जयघोष करीत अबालवृद्ध वारकऱ्यांचा मेळा सोमवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणेकरांनी पुष्पवृष्टीने स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या गजरात ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव’ असे म्हणताना वारकरी देहभान हरपून गेले होते. पालखी मार्ग जणू विठ्ठलमय झाला होता.

विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेला वैष्णवांचा मेळा अलंकापुरीतून पंढरीच्या दिशेने निघाला असून, पुण्यनगरीत सोमवारी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाकडेवाडी येथे दाखल झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन साडेसहाच्या सुमारास झाले. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी संगम पुलाजवळ पाटील इस्टेट येथे पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. पालख्या चौकात आल्यावर ‘ज्ञानोबा मााउली तुकाराम’ असा गजर करीत भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आगमनाचा आनंद व्यक्त केला. दोन्ही पालख्यांना फुलांच्या आकर्षक रचना आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. पादुकांच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी होती. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात पालख्यांवर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. पालखीमार्गावर वाहतूक बंद केल्यामुळे दुपारी रस्ते रिकामे होते; पण सायंकाळी पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी हळूहळू वाढत गेली. पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची वर्दळ दुपारी चारनंतर दिसायला लागली.

पोलिसांनी चोरीच्या संशयावरून वारीदरम्यान १५० पारधी समाजाच्या लोकांना डांबून ठेवले?

आठवडाभरापासून तयारी

पालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरीमध्ये आठवडाभरापासून जय्यत तयारी सुरू होती. गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्थांनी वारकऱ्यांसाठी पाणी वाटप, खाद्यपदार्थ, प्राथमिक औषधांच्या वाटपांचे नियोजन केले होते. महापालिका, पोलिस प्रशासन, आरोग्य खात्यानेही वारकऱ्यांचे आरोग्य, त्यांच्यासाठी मदतकार्य आणि आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून यंत्रणा सज्ज ठेवली होती. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे रुग्णवाहिकाही तैनात होत्या. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते.

VIDEO : अंगावर जखमा, डोळ्यांत भीती; आळंदीत वारकऱ्यांसोबत काय घडलं? तरुणाने सगळंच सांगितलं!

उत्साह थक्क करणारा

उन्हाच्या झळांची तमा न बाळगता चालणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह थक्क करणारा होता. खांद्यावर भगव्या पतका, गळ्यात तुळशीची माळ, टाळ, मृदुंग घेतलेले वारकरी, डोक्यावर रेखीव तुळशीवृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झालेल्या महिलांच्या चेहेऱ्यावर प्रसन्न भाव बघायला मिळाले. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आणि संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे आरती झाल्यावर दोन्ही पालख्या मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाल्या. निवडुंगा विठोबा मंदिरात तुकाराम महाराजांची पालखी आणि पालखी विठोबा मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने विसावा घेतला. वारकऱ्यांच्या आगमनाने पालखीमार्गावर, विसाव्याच्या ठिकाणी जणू चैतन्यमयी वातावरणाची अनुभूती आली.

वारीत दिसला कर्तव्य अन् भक्तीचा संगम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here