कल्याण येथील पत्रीपुल परिसरात काल रात्रीच्या सुमारास रेल्वे रुळाशेजारी एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला होता. या तपासात मृत मुलाचे नाव राजवर्धन यादव( वय १७) असल्याचे समोर आले. राजवर्धन आणि त्याचे कुटुंब उत्तरप्रदेशातील गाजीपुर येथे राहतात . राजवर्धन नुकताच बारावी पास झाला होता. त्याला महागडा मोबाईल घ्यायचा होता म्हणून त्याने कुणालाही न सांगता घरातून पैसे घेतले होते.
पैसे घेऊन तो उत्तर प्रदेश वरून मिरा भाईंदर येथे आपल्या काकाच्या घरी आला. मुंबईत आल्यावर त्या पैशांतून आयफोन विकत घेतला . त्याच्या वडिलांना घरातून पैसे गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत राजवर्धनला विचारणा केली. वडिलांना घरातून पैसे घेतल्याचे माहित झाल्याने राजवर्धन घाबरला. भीतीपोटी त्याने काल कल्याण गाठले आणि रात्रीच्या सुमारास पत्रीपुल परिसरात रेल्वे रुळालगत असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
मृतदेह पाहण्यासाठी गर्दी, ट्रॅफिक जाममुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी:
कल्याण मधील पत्रीपूल परिसरात एका झाडाला लटकलेला अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आणि मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केल्याने कल्याण-शिळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोळसाडी वाहतूक पोलिसांना तब्बल पाच तास तारेवरची कसरत करावी लागली असून, रात्रीच्या वेळेला अवजड वाहनेही या मार्गावरून जात असल्याने वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांचा चांगलाच घाम निघाला.