उन्हाळ्याची सुटी तसेच शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पुन्हा नव्याने सोमवारी जळगाव जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. आठवीच्या वर्गाचा पहिला दिवस असल्याने सुयोग हा सकाळी शाळेत गेला. शाळेची प्रार्थना सुरू असताना सुयोगला अचानक चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
सुयोग हा सातवीतून आठवीच्या वर्गात गेला होता. शाळेचा पहिला दिवस असल्याने तसेच खूप दिवसांनंतर पुन्हा मित्र भेटणार असल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, त्याच्यावर काळाने झडप घातली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वर्गात बसण्याचा आणि मित्र मैत्रिणींना भेटण्याचा त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. सुयोगच्या वडिलांचे आठ महिन्यापूर्वीच निधन झालं आहे. त्याच्या पश्चात आजी, आई आणि बहीण असा परिवार आहे.
सुयोगला दोन ते तीन महिन्यांपूर्वी “ईडिओपॅथिक पलमोंनरी अर्टरी हायपरटेन्शन” हा आजार असल्याचे निदान झाले होते. याबाबत त्याला दोन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांना दाखवले होते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. सुयोगची अजाराबाबतची फॅमिली हिस्ट्री देखील आहे. सुयोगच्या वडिलांचे आठ महिन्यापूर्वी याच आजाराने निधन झाले होते, तर आजोबा पण याच आजाराने वारले असल्याची माहिती दिली. सुयोग बडगुजरला हृदयाची संबंधित समस्या होती. त्यामुळे सुयोग बडगुजर याची दोन दिवसांनी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट होती. अशी सुद्धा माहिती मिळाली आहे.