पाटणा: ज्याला कुटुंब, नातेवाईक मृत समजत होतं, तो शेजारच्या राज्यात मोमोज खाताना सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बिहारच्या भागलपूरमध्ये राहणारा एक जण अचानक बेपत्ता झाला. कुटुंबियांनी बराच शोध घेतला. मात्र त्याचा ठावठिकाणा सापडला नाही. अखेर कुटुंबियांनी आशा सोडली. त्याचा मृत्यू झाला असावा, असं कुटुंबाला वाटलं. मात्र तो जिवंत असल्याची माहिती आता उघडकीस आली आहे.निशांत कुमार नावाचा इसम ३१ जानेवारी २०२३ रोजी त्याच्या सासरवाडीतून रहस्यमयरित्या गायब झाला. या प्रकरणी निशांतचा मेहुणा रवीशंकर सिंहनं सुलतानगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. निशांतचे वडील सच्चिदानंद सिंह यांनी त्यांचे व्याही नवीन सिंह आणि त्यांचा मुलगा रविशंकर सिंह यांच्यावर अपहरणाचा आरोप केला. चार महिने उलटूनही निशांत कुमारचा शोध लागला नाही. त्यामुळे त्याचं निधन झालं असावं असं कुटुंबाला वाटलं.
कुटुंबानं लावलं लग्न; तरुणीनं थोराड पतीला बांधली राखी; फोटो व्हायरल, प्रकरण थेट मोदींपर्यंत
यानंतर निशांतचा मेहुणा रविशंकर सिंह नोएडा गेला. यावेळी योगायोगानं रविशंकर सिंह नोएडाच्या सेक्टर ५० मधील एका मोमोजच्या दुकानात गेला. भिकाऱ्यासारखे कपडे घातलेल्या, दाढी-मिशी वाढलेल्या एका व्यक्तीला दुकानदार तिथून पळवून लावत असल्याचं त्यानं पाहिलं. त्याला पाहून रविशंकर सिंह यांना दया आली. ‘बिचारा गरीब दिसतोय. त्याला मोमोज खायला द्या. त्याचे पैसे मी देईन,’ असं रविशंकर यांनी दुकानदाराला सांगितलं.

भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची रविशंकर यांनी चौकशी केली. त्याला नावं विचारलं. त्याचं नाव ऐकताच रविशंकरच्या पायाखालची जमीन सरकली. रविशंकर ज्याला भिकारी समजला होता, तो त्याचा भावजी निशांत कुमार होता. चार महिन्यांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. या प्रकरणात निशांत यांच्या वडिलांनी रविशंकरविरोधात एफआयआरही दाखल केला होता.
सर्पदंश झाल्यावर तरुण सापाला घेऊन रुग्णालयात; डॉक्टरांनी विचारलं, याला का आणलं? तर म्हणतो…
ज्या व्यक्तीमुळे दोन कुटुंबांमध्ये वाद झाले, प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं, तो जिवंत असल्याचं पाहून दोन्ही कुटुंबांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर रविशंकर यांनी १०० नंबरवर फोन करुन पोलिसांना बोलावलं. दिल्ली पोलिसांनी निशांतला ताब्यात घेतलं आणि बिहार पोलिसांच्या ताब्यात दिलं. यानंतर मंगळवारी भागलपूर कोर्टात त्याला हजर करण्यात आलं. निशांतचं अपहरण झालं होतं का, तो बेपत्ता कसा झाला, दिल्लीला कसा पोहोचला, याचा तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here