मुंबईः नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत राज्यानं यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाश शिंदे यांनी आज केले.
नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाईन सोहळ्यास महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री श्री. शिंदे, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरविकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी उपस्थित होते.

नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे. याबद्दल सर्व महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या टीमचे विशेष कौतुक नगरविकासमंत्र्यांनी केले. देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील शहराला मिळाला आहे. विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे. पश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरी तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला आहे.

२५ ते ५० हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून तर स्वच्छते कामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या वरोरा शहराला देखील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ५० हजार ते एक लाखाच्या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून बल्लारपूरचा गौरव करण्यात आला असून नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आले आहे. देहू रोड कॅन्टोमेंट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.

महाराष्ट्र अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील १०० अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४३ पैकी ३१ शहरांचा समावेश आहे. राज्यातील ७५ टक्के अमृत शहरे पहिल्या १०० शहरांमध्ये आली आहेत. २५ नॉन अमृत शहरांपैकी २० महाराष्ट्रातील आहेत. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश आहे. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील २१६ शहरे ओडीएफ प्लस तर ११६ शहरे ओडीएफ प्लस प्लस झाली आहेत

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात (नागरी) महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षापासून दर्जेदार काम करत देशातील अव्वल कामगिरीचे सातत्य राखले आहे. या अभियानात राज्यातील शहरांनी केलेल्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक पुरस्कार देऊन घेण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

Leave a Reply to เบอร์มงคล Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here