मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपासासाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहे. सीबीआयच्या पथकात ४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे पथक मुंबईत आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत आले आहे. पण हे पथक मुंबई येण्याच्या जवळपास तासभर आधी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयकडून तपास करण्यात येत असल्याने मुंबई पोलिसांना या तपासात सीबीआयला सहकार्य करावं लागणार आहे. दुसरीकडे सीबीआयने या प्रकरणी मुंबई पोलीस आणि सीबीआयमध्ये समन्वय राखण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. सीबीआयचे डीआयजी सुवेझ हक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांमध्ये काय झाली चर्चा?

सीबीआयचे पथक मुंबई दाखल होण्याच्या जवळपास पाऊणतास आधी मुंबईचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. संध्याकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास परमबीर सिंह हे घाईघाईत मंत्रालयात दाखल झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी त्यांची चर्चा झाली. काही मिनिटांत चर्चा आटोपल्यानंतर परमबीर सिंह तिथून निघाले. पण गृहमंत्री आणि आयुक्तांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे कळू शकले नाही. आधीच सुशांतसिंह प्रकरणी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांच्या भूमिकेबाबात शंका उपस्थित केली जातेय. त्यातच मुंबई पोलीस आयुक्तांच्या या धावत्या भेटीने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतल्यानंतर परमबीर सिंह हे मंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस सीबीआयला सहकार्य करणार का? असा प्रश्न परमबीर सिंह यांना केला गेला. ‘सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलीस सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार’, असं परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here