राहुल भगवान येवले (वय २३, रा. सिंहगड कॅम्पस, पुणे, मूळ रा. बहिरवाडी, ता. नेवासा, अहमदनगर) असं बुडालेल्या तरुणाचे नाव असून महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. राहुल हा शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. पुण्यात तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, राहुल येवले हा पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. रविवारी सुट्टी असल्याने तो आपल्या मित्रांसोबत खडकवासला येथील धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तो बाजूलाच बसून होता. त्यानंतर तो कमी पाण्यात उतरला. त्या पाण्यात त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात वाहून गेला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र वाहत्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. राहुल येवले हा देवगड भक्त परिवारातील सदस्य असलेले भाऊसाहेब येवले यांचा चिरंजीव होता. मंगळवारी त्याच्यावर नेवासा तालुक्यातील बहिरवाडी शिवारात असलेल्या निवासस्थानाजवळील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल येवले याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण, मेव्हणे असा परिवार आहे. घरातला मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.