शहरातील भंडारी कंपाऊंड येथे सनलाईट हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी नजीकच्या साठे नगर परिसरात राहणारे नितीन कांबळे यांची चार वर्षीय मुलगी श्रद्धा हिला उलट्या होत असल्याने उपचारासाठी दाखल केले होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास श्रद्धा हीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रद्धाला सलाईन मधून इंजेक्शन देण्यात आले.
त्यानंतर श्रद्धा बेशुद्ध पडून निपचित झाली आणि त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हे कळताच रुग्णालयात असलेल्या श्रद्धाच्या नातेवाईकांनी आकांडतांडव सुरू केला. त्यानंतर तेथे जमा झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टर परिचारिका यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी नातेवाईकांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर श्रद्धाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.