बंडू येवले, पुणे (लोणावळा) : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील कुणे पुलावर मिथेनॉल केमिकलची वाहतूक करणाऱ्या टॅंकरला लागलेल्या आगीच्या विचित्र दुर्घटनेतील मृतांची संख्या पाच झाली असून, अद्याप दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या इन्होवा कार चालकाचा आज बुधवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर केमिकलची वाहतूक करणाऱ्या टॅंकरची आणि टॅंकर चालकासह टॅंकरमधील जखमींची ओळख पटली असून, साताऱ्यातील काकडे ट्रान्सपोर्टचा टॅंकर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

गणेश एकनाथ पळसकर (वय-३२, रा.घाटकोपर, मुंबई) असं केमिकल टॅंकरला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे होरपळून मृत्यू झालेल्या इन्होवा कार चालकाचे नाव आहे. तर जनार्दन बापुराव जाधव (रा.सातारा) असे होरपळून मृत्यू झालेल्या टॅंकर चालकाचे नाव असून, नितीन सुखदेव सप्रे (रा. सातारा), चंद्रकांत आप्पासाहेब गुरव (रा.पुणे) अशी होरपळून गंभीर झालेल्या टॅंकरमधील व्यक्तींची नावे आहेत. तसेच कुशल कैलास वरे (वय-८ वर्ष), सविता कैलास वरे (वय- ३४, मूळ रा. राजमाची, सध्या रा. कुणेनामा, खंडाळा, मावळ), रितेश महादू कोशीरे (वय-१७, मूळ रा. भांबार्डे, अकोले, मुळशी, सध्या कुणेनामा, खंडाळा, मावळ) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या मुलांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

Breaking: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प, केमिकल टँकरचा भडका; ३ जण होरपळून मृत्यू
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील काकडे ट्रान्सपोर्टचा मिथेनॉल केमिकलची वाहतूक करणारा टॅंकर (क्रमांक -एमएच-४२/बीएफ-९९८९) हा सातारा येथून मिथेनॉल केमिकल घेऊन पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरून मुंबईला चालला होता. मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास खंडाळा घाटातील कुणे पुलावरील तीव्र उतारावरील वळणावर केमिकलची टॅंकरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टॅंकर पुलाच्या संरक्षक दुभाजकावर आदळून सुमारे शंभर ते दीडशे मीटर अंतरावर पर्यंत पुलाच्या संरक्षक दुभाजकाला घासून मार्गावर पलटी झाला होता.

पलटी झालेल्या टॅंकरमधील ज्वलनशील मिथेनॉल केमीकलने अचानक पेट घेतल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत टॅंकरचा स्फोट झाला होता. यादरम्यान एक्सप्रेस वेवरील कुणे पुलाखालून राजमाची लोणावळा रस्त्याने जाणाऱ्या एका मोटारसायकलवर टॅंकरमधील आगीचा डोंब पडला. यामध्ये मोटारसायकलवरील सविता कैलास वरे, कुशल कैलास वरे व रितेश महादू कोशीरे यांचा होरपळून मृत्यू झाला. तर कुणे पुलाखाली पार्किंग केलेली पाच वाहनेही केमीकलच्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे जळून खाक झाली. यापैकी पुलाखाली पार्किंग केलेल्या इन्होवा कारचाही समावेश होता.

इन्होवा कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे कारमधील चालक गणेश एकनाथ पळसकर हाही पेटला होता. कार चालक गणेशने आगीतून आपला जीव वाचवण्यासाठी पुलाजवळच शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या ओढ्याच्या दिशेने धाव घेत ओढ्याच्या पाण्यात उडी मारून आग विझविण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी काही स्थानिकांनीही त्याला लागलेली आग विझविण्यासाठी त्याच्या अंगावर ओढ्यातील पाणी ओतले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली.

आगीत होरपळून जखमी झालेल्या गणेश व टॅंकरमधील दोघांना तत्काळ उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णवाहिकेतून सोमाटणे व पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी इन्होवाचा कार चालक गणेश एकनाथ पळसकर याचा आज बुधवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर नितीन सुखदेव सप्रे आणि चंद्रकांत आप्पासाहेब गुरव यांच्यावर उपचार सुरू असुन, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे करत आहेत.

नवरदेव खांद्यावर, वऱ्हाडी मंडळी दऱ्याखोऱ्यातून २० किमी पायी चालले, पहाटे निघालेलं वऱ्हाड दुपारी लग्नमंडपात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here