आजच्या दिवसाचं काय वर्णन करू मी. वारकऱ्यांचा हा मेळा म्हणता म्हणता केवढा वाढला आहे हे आजची दृश्य बघितल्यावर कळलं. पहाटे लवकर उठून माऊलींच्या पालखीमागे चालायला सुरू केलं. पालखी शिंदे छत्रीजवळ आरतीसाठी येऊन थांबताच चौकात माऊलीच्या पादुका स्पर्शासाठी वारकऱ्यांची तोबा गर्दी एकवटली होती. मला वाटलं ही खूप गर्दी आहे. आमची गाडी घेऊन कडेकडेने पुढे येत येत दिवाघाटाच्या वर टॉप व्ह्यूवसाठी आधीच येऊन बसलो. येताना एका क्षणासाठीही रस्ता रिकामा नव्हता. उलट गर्दी वाढतच होती. माऊलींच्या पालखीने वडकी नाला येथे थोडी विश्रांती घेतल्यावर घाट चढायला सुरुवात केली आणि सारे फोटोग्राफर्स, आमच्यासह सर्व चॅनेलवाल्यांनी आपला तळ जिथून चांगला व्ह्यू मिळेल तिथे हलवला. पालखी बघायला आलेल्यांनीही आपापल्या जागा सांभाळून ठेवल्या आणि कडक उन्हातही बराच काळ केवळ पालखी बघण्यासाठी थांबले. संध्याकाळी जणू या घाटाने तुळशीमाळ घातली आहे आणि वळणावळांची रिघ लागली होती. हा एवढा प्रचंड संख्येने चालत जाणारा वारकरी संप्रदाय बघून आज माऊली विसाव्याला बसल्यावर म्हणत असेल ‘इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ 

वाढीच्या दृष्टीने जरी हा संप्रदाय एवढा अजागळ असला तरी तत्वज्ञानाच्या दृष्टीने मात्र, एवढा अजागळ नाही. या संप्रदायाचा एक दिव्य विचार आहे आणि त्या विचाराला केंद्रस्थानी ठेऊनच वारकरी आपलं जीवन जगत असतात. तो विचार म्हणजे, हे विश्व देवाने निर्माण केलंय त्यामुळे इथली प्रत्येक गोष्ट ही त्याच्या आज्ञेने आणि अनुमोदनाने घडते. त्याच्याशिवाय इथे झाडाचं पानही हलवता येणं शक्य नाही. असं या संप्रदायात मानलं जातं. म्हणून की काय पंढरीला निघालेले वारकरी एक गोष्ट पक्की ठरवून निघतात ती म्हणजे ‘आता बोलणेची नाही, देवावीण काही.’ 

सकाळी 6 वाजताच पुण्यातून प्रस्थान ठेवणारी माऊलींची पालखी आज घाट चढत असताना वाटेत कित्येक लोकं भेटली. म्हणजे आम्ही जरी पूर्ण घाट चालून आलो नसलो तरी ती वर घाट चढून आल्यावर आम्हाला भेटत होती. यात कोण कोण आणि कसे कसे लोक भेटले म्हणून सांगू. माऊली अहो, आयुष्यात थोडं जरी टेन्शन, फ्रस्ट्रेशन येत असेल ना तर एकदा किमान एक दिवस वारीत सामील व्हावं. संपला विषय. मला मराठवड्यातील परभणीची एक दिंडी भेटली ज्यात वयोवृद्ध शेतकरी वर्गच होता. अवकाळी पावसात आपली पिकं धुवून निघाली. जे पीक आलं त्याला भाव नाही. पुन्हा नव्या उमेदीने शेती करावं म्हटलं तर अजून पाऊस नाही. एक ना अनेक गोष्टी असताना त्यांना त्याचं काही वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर तसं जाणवतही नव्हतं. काय सांगावं महाराज अशी लोकं तुम्हाला संयम शिकवून जातात. आयुष्यात एवढं संकट असूनही देवाकडे काही मागणं नाही की काही साकडं नाही. केवळ भेट महत्वाची. उलट यांच्यातीलच काही वारकरी तर आपल्या पदरचे पैसे घालून एकादशीमुळे फराळाची सेवा देत होते. ते बघून मला तुकोबांचा अभंग नकळत आठवून गेला. ‘संत उदार उदार, देती आले असे दान’.  सर्व सोसूनही देण्याचीच वृत्ती अंगी बनलेल्या या वारकऱ्यांना संत का म्हणू नये?

त्यानंतर मला 3 वेगळेच अवलिया तरूण भेटले. ते आयटीमध्ये काम करतात. बाईक रायडर आहेत. वारकरी संप्रदाय आणि त्यांचा दूर दूर पर्यंत कोणताही संबंध नाही. तरीही  केवळ या वरकाऱ्यांकडे बघून त्यांना यांची सेवा करायची इच्छा झाली म्हणून काय करता येईल तर आपल्या बाईकलाच त्यांनी Ambulance करून टाकली आणि अरुंद रस्त्यांवर चालताना माणसाला माणूस घसतो तिथे हे या बाईक Ambulance वरून अत्यावश्यक सेवेची गरज असलेल्या वारकऱ्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. पदरचे पैसे आणि वेळ घालवून. इंटरेस्टिंग ना? 

आता पुढचा किस्सा फार भारी आहे. एक वारकरी आहे जो आपल्या वडिलांना प्रतिवर्षी वारीला नेत असे. वडिलांच्या निधनानंतर त्या वारकऱ्याने चक्क आपल्या वडिलांचे मंदिर करत अॅक्टिवा गाडीवरून हा वारकरी अजूनही आपल्या वडिलांना वारी घडवतो आहे. एक वारकरी तर गाढवावर स्वर होऊन जाताना पहिला. त्याच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला. पण त्याला आपल्या गाढव मित्राला सोडून माझ्याशी बोलण्यात काही रस नव्हता. काही आणखी लोकं भेटली जी विशेष सांगण्यासारखी नाहीत. हा, 3 तृतीयपंथी आज मोठ्या आनंदात चक्क हलग्यांच्या तालावर बेभान होऊन नाचत होते. फुगड्या खेळत होते. फुगड्या खेळून झाल्यावर सगळे त्यांच्या पाया पडत होते. ते ही सर्वांच्या पाया पडत होते (वारकरी संप्रदायात एकमेकांच्या पाया पडायची पद्धत आहे) हे पाहून खूप बरं वाटलं. ‘सकळांसी येथे आहे अधिकार’ ही उक्ती खरी ठरली. 

2 अधिकच्या मानाच्या जोड्या लावून पालखीचा रथ एकदाचा दिवेघाट पार झाला आणि सर्वांनी करतलध्वनी करत माउलींचे सासवड नगरीत स्वागत केले. इथे येऊन माउलींनाही दर वेळी भरून येत असेल. माउलीचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांचे हे समाधीस्थळ. दोन भावंडांची ही भेट त्यांच्याबरोबरच सबंध वारकाऱ्यांमध्ये मायेचा पाझर फोडणारी नक्कीच असेल. हेच सोपनकाका आता माउली सासवडमध्ये आल्यावर  विठुरायाच्या भेटीसाठी उद्या प्रस्थान ठेवतील. प्रस्थानांनंतर बोलूच. तूर्तास रामकृष्ण हरि.

वाचा मयूर बोरसे यांचे इतरही ब्लॉग :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here