म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘उदारमतवादी लोकशाहीची रचना लोकांच्या कल्याणासाठी अशी असली तरी ठिकठिकाणी सत्ता एकवटली आहे. जगभरातील लोकशाहीची रचना पाहिली तर लांबून लोकशाहीचा सभ्य चेहरा दिसतो; पण त्याआडून हुकूमशाहीच कारभार सुरू असतो. तुर्की, अमेरिका आणि भारत या देशांमध्ये लोकशाहीच्या आडून हुकूमशाहीच सुरू आहे,’ असे परखड मत ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते व स्वराज अभियानचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी गुरुवारी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘करोना के बाद स्वराज का अर्थ’ या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते.

‘लोकशाही रचनेला जगात पन्नास वर्षांत मान्यता मिळाली आहे. लोकशाहीमुळे हुकूमशाही व्यवस्थेविरोधात लढायला बळ मिळाले असले तरी जगात सगळीकडे लोकशाहीच्या नावाने विशिष्ट लोकांनी फायदा करून घेतल्याचे दिसते. सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने राजकीय पक्ष , नेते आणि श्रीमंत लोकांना फायदा झाला आहे. लोकशाहीची व्याख्या लोकांच्या कल्याणासाठी लोकांचे राज्य अशी असली तरी वास्तवात लोकशाही म्हणून निवडणुका होत राहतात; पण व्यवहारात हुकूमशाही कार्यपद्धती असते,’ अशी परखड मांडणी यादव यांनी केली.

‘लोकशाहीमध्ये लोकांना बळ मिळाले पाहिजे; पण लोकांपेक्षा व्यवस्था मजबूत होताना दिसते. यापुढे निवडणूक, मतदान ही प्रक्रिया होत राहील; पण व्यवहारातील हुकूमशाहीची कार्यपद्धत बदलण्यासाठी लोकशाहीची नवी रचना आखावी लागेल,’ यावर त्यांनी बोट ठेवले.

‘संयत पद्धतीने खरे बोलण्याचे धाडस कमी लोकांमध्ये असते. ते दाभोलकरांमध्ये होते. सध्या ते प्रशांत भूषण यांच्यामध्ये दिसते,’ अशी टिप्पणी करून यादव यांनी ‘परिवर्तनवादी लोक दाभोलकरांप्रमाणे सामान्यांच्या भाषेत बोलणार नाहीत तोपर्यंत विवेक आणि धर्मनिरपेक्ष विचार रूजणार नाही,’ अशा कानपिचक्या दिल्या.

युरोपातील राष्ट्रवाद तोडणारा

‘आपण एकटे नाही तर समूह जीवन जगत आहोत,’ ही भारताच्या राष्ट्रीयत्वाची संकल्पना आहे. या संकल्पनेत राजकीय व सांस्कृतिक सीमा आडकाठी ठरत नाहीत. एक राष्ट्र, एक भाषा, एक विचार, एक संस्कृती हा युरोपातील विचार आणि तेथील राष्ट्रवाद सध्या आपण अवलंबत असल्याने प्रत्येक गोष्टीला राष्ट्रवादाशी जोडले जात आहे. या राष्ट्रवादाने देशा- देशांना तसेच देशाच्या अंतर्गत राज्यांना तोडण्याचे काम केले आहे,’ अशी टीका योगेंद्र यादव यांनी केली. ‘राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीयवाद पर्याय ठरत नाही. गाव, समाज, देश आणि जग यांच्याशी जोडणारा विचार आवश्यक आहे,’ असे ते म्हणाले.

दाभोलकरांना न्याय कधी?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला गुरुवारी सात वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणातील सूत्रधार मोकाट असल्याने महाराष्ट्र अंनिसतर्फे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी ‘खुनाच्या प्रकरणातील सूत्रधारांना कधी पकडणार आणि न्याय कधी मिळणार,’ असा सवाल करत ‘जवाब दो’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. ‘फुले- शाहू- आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर’ असा नारा कार्यकर्त्यांनी दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here