वर्षाच्या सुरुवातीला अदानी समूहाविरुद्ध प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे शेअर मार्केटला मोठे झटके बसले. पण २० मार्च २०२३ नंतर विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून बाजार सातत्याने झेप घेत आहे. अशा स्थितीत गेल्या तीन महिन्यांत मार्केट गुंतवणूकदारांच्या संपत्तीत बंपर झेप झाली असून या कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्ती सुमारे ३७ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक
सुरुवातीच्या व्यवहार सत्रात बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स १५० अंक घरून व्यवहार करत होता, तर बीएसईवरील मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी अनुक्रमे ३२,१५६.०९ आणि २८,१६४.९८ अंकांसह नवीन सर्वकालीन उच्च पातळी नोंदवली.
फेडचा दर वाढीवर ‘पॉज’
अलीकडेच अमेरिकेची केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदर वाढीला ब्रेक लावला. केंद्रीय बँकेने यावेळी व्याजदरात वाढ केली नसली तरी २०२३ च्या अखेरीस व्याजदर आणखी २ पट वाढू शकतात, असा इशारा फेड रिझर्व्हने दिला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना धक्का बसला.
या वर्षी आणखी २ पट वाढणार व्याजदर?
कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे CIO (फिक्स्ड इन्कम) दीपक अग्रवाल म्हणाले की FOMC ने आणखी दोन दर वाढीची शक्यता सांगून बाजाराला चकित केले आहे. त्यांनी म्हटले की, महागाई कमी झाल्यामुळे फेडने दर वाढीचे पॉज बटण दाबले आहे. यापूर्वी फेडरल रिझर्व्हने सलग १० वेळा व्याजदर वाढवले असून चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी यूएस फेडने धक्कादायक निर्णय घेतले. सध्या अमेरिकेत मुख्य व्याजदर ५ ते ५.२५ टक्के आहे.