२०१५ मध्ये भगवानगडावर सुवर्ण महोत्सवी सप्ताह सुरू होता. दर्शनासाठी धनंजय मुंडे गडावर गेले. पण संतप्त जमावाकडून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर धनंजय मुंडे दर्शन न करताच माघारी परतले होते. मात्र यावेळी खुद्द गडाचे महंत यांनीच धनंजय मुंडे यांना मंत्री होऊन गडावर या असं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी गडावर जाऊन भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही देण्यात आलं आहे. त्यामुळे कोणतंही राजकारण न करता बीड जिल्ह्याचा विकास करायचा आहे, असं ते म्हणाले. यासोबतच धनंजय मुंडे यांनी नारायण गड आणि गहिनीनाथ गडावर जाऊनही दर्शन घेतलं.
‘गडावर मी पाईक म्हणून गेलो. गडाची, मठाची सेवा करणे आमची जबाबदारी आहे. इथून पुढे गडाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहणार. हा गड भगवानबाबांनी निर्माण केलाय. इथे गडापेक्षा कोणीही मोठे नाही, भगवानबाबापेक्षा कोणीही मोठे नाही. हीच माझी श्रद्धा आहे’, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर दिली.
धनंजय मुंडेंना नामदेव शास्त्रींकडून निमंत्रण
धनंजय मुंडे आणि या बहीण-भावातील प्रतिष्ठेची लढाई राज्याला परिचित आहे. पण लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडावर येण्यासाठी धनंजय मुंडेंना पहिल्यांदाच निमंत्रण देण्यात आलं. यापूर्वी धनंजय मुंडे एकदा गडावर गेले असता त्यांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला होता. यानंतर गडावर कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही, अशी भूमिका घेत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर होणारा दसरा मेळावा बंद केला.
नामदेव शास्त्रींच्या विरोधानंतर पंकजा मुंडेंना भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यावा लागला. त्यानंतरच्या वर्षातही नामदेव शास्त्रींचा विरोध कायम राहिला. परिणामी पंकजा मुंडे या गडावर खाली उतरल्या आणि त्यांनी संत भगवान बाबा यांचं जन्मगाव सावरगावात दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली.
भगवानगड दसरा मेळावा संघर्ष
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे दरवर्षी दसऱ्याला भगवानगडावरुन संबोधित करायचे. या कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून समर्थक गडावर यायचे. पण गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात मतभेद झाले. या मतभेदांचं कारण कधीही समोर आलं नसलं तरी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडाची स्थापना केल्याचं नामदेव शास्त्री यांना रुचलं नाही असं बोललं जातं. यानंतरच भगवानगडावरील दसरा मेळावाही बंद करण्यात आला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times