‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

तब्बल पाच महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सर्वसामान्यांचा एसटी प्रवास सुरू झाल्याने प्रवासी सुखावले आहेत. कोणत्याही शक्य असल्याने खिशावरील भारही हलका झाला आहे. एकीकडे प्रवास सुरू झाला, मात्र एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर विलगीकरणाच्या नियमांत स्पष्टता नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण कायम आहे.

अनेकांनी थेट प्रवास करण्यापूर्वी चौकशीकरून एसटी प्रवास करण्याला पसंती दिली. यामुळे पहिल्याच दिवशी प्रवाशांचा कमी प्रतिसाद लाभला. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर स्थानकावरील प्रवाशांनी, विलगीकरण करणार का?, घरी जाऊ देणार का? की संस्थात्मक विलगीकरण करणार? अशा प्रश्नांचा भडिमार प्रवाशांनी एसटी अधिकाऱ्यांवर केला. एसटी अधिकाऱ्यांमध्ये नियमांबाबत स्पष्टता नसल्याने ते निरुत्तर ठरत होते. परिणामी प्रवाशांच्या त्रासात अधिकच भर पडत होती, असे चित्र मुंबईसह उपनगरांतील एसटी स्थानकांवर दिसून आले.

दादर-पुणे मार्गावरील एसटीची प्रतिष्ठित शिवनेरी बस २० प्रवाशांसह सकाळी ८ वाजता निघाली. ‘लॉकडाउनमुळे पाच महिने घरीच होतो. दलालांकडून पास मंजूर करण्यासाठी प्रतिप्रवासी ५०० ते १००० रुपये असा ‘रेट’ सुरू आहे. लॉकडाउनमध्ये आधीच हालाखीची स्थिती असल्याने काटकसरीने खर्च सुरू आहे. दलालांना पास मिळतो, सर्वसामान्यांना नाही, ही आजची स्थिती. एसटी सुरू झाल्याने या सगळ्यांमधून सुटका झाली’, अशी प्रतिक्रिया दादर-पुणे या पहिल्या शिवनेरीने प्रवास करणाऱ्या संदेश घाडीगावकर या प्रवाशांने व्यक्त केली.

मुंबई, ठाणे आणि पालघर येथून एकूण २५ एसटी शुक्रवारी रवाना करण्यात आल्या. आतंरजिल्हा वाहतुकी अंतर्गत महामंडळाने गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत ७२१ बसच्या एकूण ८०० फेऱ्या केल्या. पहिल्या दिवशी प्रतिसाद कमी लाभल्याने मागणीनुसार गाड्या चालवण्याचे आदेश राज्यातील सर्व विभागांना देण्यात आले आहेत, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्य सरकारच्या मंजुरीनंतर गाड्या सुरू करण्यात आल्या. एसटी महामंडळ हे वाहतूकदार आहेत. विलगीकरणाचे अधिकार, जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची आहे. प्रवाशांना एसटीतून प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

– शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here