माटुंगा ते सायन येथील रोड क्रमांक २६ धारावी धोबीघाट दरम्यानच्या रेल्वेमार्गावर मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेने धारावी टी जंक्शन येथे पंपांसह मिनी पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पंपिंग स्टेशनच्या उभारणीची प्रस्तावित जागा सीआरझेड अंतर्गत येत असल्याने पर्यावरण आणि वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. पालिकेला तूर्तास वन विभाग आणि महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एमसीझेडएमए) कांदळवन विभागाची परवानगी मिळाली आहे. सप्टेंबर २०२३च्या अखेरीस वन मंत्रालयाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कामाला सुरुवात केली जाईल. सन २०२४च्या पावसाळ्यापूर्वी मिनी पंपिंग स्टेशन उभारून कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर मुख्याध्यापक भवन, सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यानचे रेल्वेरूळ, सायन येथील रोड क्रमांक २६, धारावी धोबीघाट येथे पाणी साचण्याच्या समस्येपासून सुटका होईल. यासाठी ४.५ क्यूबिक मीटर प्रति सेकंद क्षमतेचे दोन पंप बसवण्याचे प्रस्तावित आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मिनी पंपिंग स्टेशनचे काम पुढील पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे मुसळधार पावसात समुद्रात भरती असली तरी पूर येणार नाही, अशी व्यवस्था पालिका करत आहे. पालिकेने सध्या संत रोहिदास मार्ग आणि सायन-वांद्रे लिंक रोडवरील कल्व्हर्टजवळ बॉक्स ड्रेन तयार केला आहे. बॉक्स ड्रेनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सोबत पूरनियंत्रक दरवाजे आणि पाणी उपसा करणारे पंप यामुळे या परिसराला काही प्रमाणात दिलासा मिळेल, असा दावा पालिकेने केला आहे.