भोपाळ: मध्य प्रदेशच्या नीमच शहरात वर्दळीच्या रस्त्यावर अचानक गोंधळ उडाला. एका महिलेनं तिच्या बॅगेतून ५००-५०० रुपयांच्या नोटा काढून हवेत उडवण्यास सुरुवात केली. महिलेला भररस्त्यात नोटा उडवत असताना वाटसरुंना धक्काच बसला. अनेकजण वाहनं थांबवून नोटा उडवणाऱ्या महिलेला पाहू लागले. त्यामुळे रस्त्यात वाहतूककोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवलं आणि वाहतूक सुरळीत केली. राजीव नगरमध्ये वास्तव्यास असणारी ५० वर्षीय महिला गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कैंट पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर तिनं रस्त्यावर येत ५०० च्या नोटा उडवण्यास सुरुवात केली. नोटांचा पाऊस पाहून वाटसरुंना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक जण वाहनं पाहून रस्त्यावर सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा पाहू लागले. या सर्व प्रकारामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. पोलीस आपल्या तक्रारीची दखल घेत नसल्यानं महिलेनं सांगितलं. ‘पोलीस तक्रार केली असता कारवाई झाली नाही. कारवाईसाठी लाच मागितली जात होती. त्यामुळे पोलीस ठाणं गाठून त्यासमोर असलेल्या रस्त्यावर नोटा उडवल्या,’ अशी व्यथा महिलेनं मांडली. ‘सख्ख्या मुलानं वर्षभरापूर्वी मारहाण केली होती. पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव हे पाऊल उचलावं लागलं,’ असं महिला म्हणाली. यावर पोलिसांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.