सागरी किनारा मार्ग प्रकल्प हा प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. सध्या या प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यापैकी वरळी सी फेस ते मरिन ड्राइव्ह असा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. या टप्प्यातील रस्ते, साडेतीन किलोमीटर लांबीच्या बोगद्यासह अन्य कामांना गती दिली जात आहे. पहिला टप्पा येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून तो वाहनांसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी दिली.
वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत असलेला दुसरा टप्पा मे २०२४पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात किनारा रस्ता मार्ग सी लिंकला जोडताना यातील खांबांच्या आराखड्यात मच्छिमारांसाठी काहीसा बदल केला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम लांबल्याचे सांगितले जाते. पहिल्या टप्प्यात प्रियदर्शनी ते मरिन ड्राइव्हपर्यंत साडेतीन किलोमीटर लांबीचा बोगदाही सेवेत येणार आहे. त्यामुळे एकंदरीतच वरळी सी फेस ते मरिन ड्राइव्ह असा सध्या अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास दहा ते पंधरा मिनिटांत होणार आहे. या बोगद्यातून साधारण तीन ते चार मिनिटांत प्रवास होईल. या बोगद्यातून ६० ते ८० प्रतितास वेगाने वाहने जाऊ शकतील.
सध्या या बोगद्यात काँक्रिटीकरणाच्या कामांसह अग्निप्रतिबंधक उपाययोजनाही करण्यात येत आहेत. यामध्ये अग्निरोधक फायर बोर्ड बसवण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. बोगद्यांमध्ये वायुविजन प्रणाली असेल आणि ती हवेचा प्रवाह सुधारण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे एका बोगद्यात आग लागली तरीही दुसरा बोगदा मात्र धूरमुक्त राहील. १०० मेगावॉट तीव्रतेच्या आगीत किमान तीन तास तग धरू शकेल, अशा पद्धतीने या बांधकामाची संपूर्ण रचना आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचावासाठी ३०० मीटरवर ११ छेद बोगदेही तयार केले आहेत. यासह अन्य यंत्रणेचे काम सुरू आहे.
प्रकल्पाच्या खर्चात वाढ
मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या खर्चात एक हजार २०० कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. वांद्रे सी लिंकजवळील पुलाच्या आराखड्यात झालेला बदल आणि कंत्राटदाराला वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) सहा टक्के वाढीव म्हणजे एकूण १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च १२ हजार ७२१ कोटी होता. तो १३ हजार ९८३ कोटी रुपयांवर गेला आहे.
वाहनतळांची व्यवस्था
हाजीअली आणि महालक्ष्मी मंदिराजवळ तसेच वरळी येथे वाहनतळांची व्यवस्थाही केली जाणार आहे. वाहनतळांच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या किनारी मार्गालगत एक नवीन रुंद ‘सी वॉक वे’ म्हणजेच पदपथही बांधण्यात येणार आहे. किनारी मार्गाच्या बाजूने येणारा हा सागरी ‘वॉक वे’ २० मीटर रुंद आणि ८.५० किमी लांबीचा असेल आणि शहरातील सर्वांत लांब सागरी पदपथ ठरेल, अशी माहिती प्रकल्पातील उपअभियंता विजय झोरे यांनी दिली.