मुंबई: आपल्यापैकी अनेकजण गावाहून मुंबईत आलेल्या आपापल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर जात असतील. आपल्या नात्यातील वृद्ध व्यक्ती, कधीही मुंबईत प्रवास न केलेले आप्तेष्ट यांची एक्स्प्रेस ट्रेन पकडताना धांदल उडू नये किंवा त्यांचा गोंधळ होऊ नये, यासाठी घरातील किमान एकजण त्यांना सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जातात. अनेकदा संपूर्ण कुटुंबच आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकात जाते. त्याठिकाणी एक छोटेखानी निरोप समारंभच रंगतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, ही प्रथा आता किमान काही काळापुरती का होईना बंद होणार आहे. कारण, मध्य रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता तुम्हाला पुढील काही दिवस संध्याकाळच्या वेळेत प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही. परिणामी तुम्हाला नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर जायचे असल्यास ते शक्य होणार नाही.

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई विभागातील सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल येथे सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. हे निर्बंध १५ जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.

रेल्वेतून उतरताच रिक्षा? प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर नवी ‘सुविधा’, रेल्वे स्टेशनची सुरक्षा धोक्यात

मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद का केली?

एक्स्प्रेसमधून जाणाऱ्या प्रवाशांना स्थानकावर सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी फलाट तिकीट काढावे लागते. तसेच फलाटावर काही काळ थांबण्यासाठी अनेक जण फलाट तिकीट घेतात. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढते. परिणामी, इतर प्रवाशांना इच्छित फलाटावर, रेल्वेगाडीत पोहचण्यास विलंब होतो. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी आणि दादर येथे सायंकाळी ६ ते रात्री १२.३०, ठाणे येथे सायंकाळी ७ ते रात्री १.३०, कल्याण येथे सायंकाळी ६ ते रात्री १.३०, एलटीटी येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १ आणि पनवेल येथे रात्री ११ ते रात्री २ वाजेपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्बंधामधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुलांसोबत येणाऱ्या महिला प्रवाशांना सूट देण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

मुंबईत होतय तीन मजली मेट्रो स्थानक, प्लॅटफॉर्म तब्बल ३५ मीटर उंचीवर, कुठे आहे ‘हे’ स्थानक

यापूर्वी रेल्वे प्रशासनाने स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवले होते. तिकीट दर १० रुपयांवरुन ३० ते ३५ रुपये केले होते. या निर्णयाला प्रवाशांनी विरोध केला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला होता.

ये एरिया मेरा है म्हणत तरुणानं रेल्वे रुळावर मांडला ठिय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here