क्रिकेटमध्ये अनेकदा फिल्डर असे कॅच घेतात ज्यावर विश्वास ठेवणे अवघड होते. ब्रॅडलीने असाच कॅच घेतला आहे जो क्रिकेटमध्ये पुन्हा पहायला मिळेल याबाबत शंका आहे. त्याने घेतलेला हा कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हॅपशायरच्या डावातील १९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बेनी हॉवेलने टायमल मिल्सला षटकार मारण्याचा प्रयत्न केला. हॉवेलने चेंडूला उत्तम पद्धतीने मारले देखील. बॅटचा चेंडूशी चांगला कनेक्ट देखील झाला होता. चेंडू ९९ टक्के षटकारासाठी पोहोचला होता. तोपर्यंत हवेत उडी मारून ब्रॅडलीने तो पकडला. ब्रॅडलीने फक्त षटकार वाचवला नाही तर हॉवेलला माघारी देखील पाठवले.
हॉवेलने जेव्हा चेंडू मारला तेव्हा असे वाटत होते की ब्रॅडलीच्या मनात तो रोखण्याचा उद्देश नाही. पण चेंडू जस जसा सीमारेषेच्या जवळ आला तसे ब्रॅडलीचे मन बदलले. त्याने हवेत उडी मारून एका हाताने चेंडू पकडला. हॉवेलने १४ चेंडूत २५ धावा केल्या. विशेष म्हणजे ब्रॅडलीची ही टी-२० करिअरमधील पहिली मॅच होती.
हॅपशायरने टॉस जिंकून ससेक्सला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांनी २० षटकात ६ बाद १८६ धावा केल्या. ओली कार्टरने ३४ चेंडूत ६३ धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल हॅपशायरला २० षटकात ९ बाद १७७ धावा करता आल्या आणि ही लढत ससेक्सने ६ धावांनी जिंकली. ससेक्सच्या यशापेक्षा ब्रॅडलीच्या कॅचची चर्चा अधिक होत आहे.