लखनऊ: उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात वरातीत नाचताना तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत तरुण २४ वर्षांचा होता. हा तरुण नवरदेवाचा भाऊ होता. डीजेच्या तालावर नाचता नाचता तो कोसळला. तो बराच वेळ उठलाच नाही. तरुण हालचाल करत नसल्यानं मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या घटनेमुळे लग्नघरावर दु:खाचा डोंगर कोसळला.रामपूरच्या मोहल्ला गढी वैश्यानमध्ये संजूच्या भावाचं लग्न होतं. त्यासाठी तो शाहजहापूरला गेला होता. लग्न समारंभात त्यानं डीजेच्या तालावर ठेका धरला. संजू अगदी उत्साहात नाचत होता. आसपासची त्याची मित्रमंडळी होती. नाचता नाचता तो जमिनीवर पडला. त्यानं उठण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ते शक्य झालं नाही. संजू मस्करी करत असल्याचा मित्रांचा समज झाला. त्यामुळे काही वेळ त्याच्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं. संजूच्या शरीराची हालचाल होत नसल्याचं काही मिनिटांनी आसपासच्या तरुणांच्या लक्षात आलं. त्यांनी संजूला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नवरदेवाच्या भावाच्या निधनाची माहिती समजताच सगळ्यांना धक्का बसला. लग्नघरावर शोककळा पसरली. आनंदाची जागा दु:खानं घेतली. संजूच्या कुटुंबियांनी आक्रोश सुरू केला. तरुणाला नाचता नाचता हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तरुणाच्या अखेरच्या क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here