मिळालेल्या माहितीनुसार, शुभम राजेंद्र कचरे (२९) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. तसेच दिनेश प्रेमसिंग गहलोत (४७) आणि पंकज रमेश पडोळे (४५) अशी आरोपींची नावे आहेत. शुभम कचरे हा मित्रांसह हॉटेलवर जेवण्यासाठी गेला होता. तिथे त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. तेव्हा दिनेश गहलोत व पंकज पडोळे हे तिथे एका खुर्चीवर बसले. त्यावेळी पंकज पडोळे याने ‘ये भाई का टेबल है, यहा से उठो’, अशा शब्दात धमकावून शुभम कचरेला उठण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे आरोपी पंकज याने शुभमला थापड मारली.
थापड लागताच शुभम टेबलवर आदळला, परंतु वाद वाढू नये, म्हणून शुभम व त्याचे मित्र तेथून बाहेर जाण्यास निघाले. ते हॉटेलच्या बाहेर आले असता दिनेश आणि पंकज हे सुद्धा त्यांच्यामागे बाहेर आले. तेव्हा दिनेश याने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर काढून कानपट्टीवर लावली. अनर्थ घडू नये म्हणून पंकजने सांगितल्यानंतर दिनेश गहलोतने रिव्हॉल्व्हर मागे घेतली. तेथून निघताच शुभमने नांदगाव पेठ पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. त्यावरून दिनेश गहलोत आणि पंकज पडोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हत्यार जप्त करण्यात आले आहे.