म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पाऊस, शेतीचे नुकसान, आर्थिक विवंचना या गर्तेत अडकलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारस्तरावर अनेक प्रयत्न केले जात असल्याचा दावा अजूनही फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच महिन्यांत मराठवाड्यात ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालातून उघड झाले आहे. त्यात आता पावसाने ओढ दिल्याने सरकारी यंत्रणा, राज्य सरकारसमोर आत्महत्या सत्र रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

विभागीय आयुक्तालयातून प्राप्त अधिकृत आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३१ मे २०२३ या पाच महिन्यांत मराठवाड्यात ३१९ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९८, त्या खालोखाल धाराशीव जिल्ह्यातील ८० शेतकऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे अर्ध्याहून अधिक मराठवाड्यामध्ये खरिपाचे पीक हातचे गेले होते. काही ठिकाणी दुबार पेरणी केल्यानंतर जास्तीच्या पावसाचा फटका बसला होता. सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. मात्र, अजून दोन वर्षांपूर्वीच्या नुकसानीचीच रक्कम अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यात गेल्या वर्षीच्या शेती नुकसानीची भर पडली. विमा कंपन्यांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मे अखेरपर्यंत वीकविम्याचे पैसे मिळतात; पण यंदा शेतकरी त्यापासून वंचित आहेत. अवकाळी व गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांनाही मोठा फटका बसला होता. हातातोंडाशी आलेली पिके गारपिटीने उद्ध्वस्त झाली. कापसाला भाव मिळाला नाही. एकूणच मराठवाड्यातील शेतकरी अडचणीच्या कोंडीत सापडला आहे. सरकारकडून केले जाणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याची भावना आहे.

Prakash Ambedkar: औरंगजेबावरुन वाद निर्माण करणारे त्याच्याच दरबारात नोकऱ्या करायचे, प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला सरकारकडून सानुग्रह अनुदानापोटी एक लाखाची मदत करण्यात येते. मराठवाड्यातील २३६ शेतकरी सरकारच्या या निकषात बसत असल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदानाची रक्कम प्रदान करण्यात आली. सुमारे ५७ शेतकऱ्यांच्या वारसांना मात्र निकषात बसत नसल्याने मदत करण्यात नकार देण्यात आला. ९८ प्रकरणांची चौकशी महसूल व पोलिस विभागाकडून सुरू असल्याचे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले?

छत्रपती संभाजीनगर ५०

जालना २५

परभणी ३२

हिंगोली १३

नांदेड ६५

बीड ९८

लातूर २८

धाराशिव ८०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here