चिपळूण : जून महिना मध्यावर आला तरीही राज्यात पावसाची अपेक्षित सुरुवात झाली नाही. याऊस लांबणीवर पडल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट ओढवले असून त्याचा मोठा परिणाम कोयना वीजनिर्मिती प्रकल्पावर झाला आहे. कोयना प्रकल्पातील सगळ्यात मोठा असलेल्या चौथ्या संचातून वीजनिर्मिती बंद झाली आहे. कोयना जलविद्युतचा महत्त्वाचा संच बंद करण्यात आल्याने आता राज्य सरकारी महानिर्मिती कंपनीच्या कोळसाआधारित औष्णिक विजेवरील ताण वाढणार आहे. आतापर्यंत एकूण वीज उत्पादनात ७५ टक्क्यांपर्यंत कोळसाआधारित असलेली वीजनिर्मिती आता ९० टक्क्यांवर नेण्याची वेळ महानिर्मिती कंपनीवर येणार आहे.पावसाने पाठ फिरवल्याने कोयना धरणातील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे येथील वीजनिर्मितीचा चौथा संच बंद करावा लागला आहे. कोयना वीजप्रकल्पातून एकूण १,९६० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते. त्यातील सगळ्यात महत्त्वाच्या चौथ्या संचातून १ हजार मॅगावॉट वीजनिर्मिती होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी येथील चौथा संचातून वीजनिर्मिती पूर्णपणे थांबली असून येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पहिला, दुसरा आणि तिसऱ्या संचाची वीजनिर्मितीही अडचणीत येण्याची भीती आहे. कोयना धरणातील पाण्याअभावी वीजप्रकल्प बंद झाल्यास त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या वीजनिर्मितीवर होऊ शकतो.

कोयना वीजनिर्मिती प्रकल्प पूर्णपणे अडचणीत आल्यास त्याचा मोठा परिणाम चिपळूण तालुक्यातील काही गावांवर पाणीटंचाईमुळे होईल. कोयनेच्या अवजलावर चिपळूण व वाशिष्ठी नदीलगतची गावे तसेच लोटे, गाणे-खडपोली, आरजीपीपीएल, खेर्डी येथील औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. ‘कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातील चौथा संच बंद झाल्यानंतरही महाराष्ट्रातील वीज पुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही. राज्यातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून वीजनिर्मिती सुरू आहे. तसेच चौथा संच बंद झाल्याने त्याचा चिपळूणच्या पाण्यावरही कोणताही परिणाम होणार नाही. उर्वरित टप्प्यांमधून वीजनिर्मिती सुरू आहे’, असे कोयना वीजप्रकल्पाचे निवृत्त मुख्य अभियंता आणि जागतिक बँकेचा प्रकल्प असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील ३० धरणांसाठी नेमण्यात आलेल्या सेफ्टी पॅनलचे अध्यक्ष दीपक मोडक यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले. चौथा संच बंद करण्याची वेळ यापूर्वीही आली होती. २०१९मध्येही वीजनिर्मितीचा चौथा संच बंद ठेवावा लागला होता, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पाण्याची काटकसर

कोयना जलाशयाची पातळी शनिवारी सकाळी ६१९.७८ मीटर आणि साठा १२.०८ टीएमसीवर आला आहे. यापूर्वी जलाशयातील कमीत कमी साठा १८ जून १९९६ रोजी नोंदवला गेला. तो ६१८.३६३ मीटर होता आणि त्यावेळचा साठा १०.६६ टीएमसी इतका होता. मात्र त्यावेळी चौथा संच अस्तित्वात नव्हता. १ जून २०१९ रोजी जलाशय पातळी ६२३.३६७ मीटर पातळी गाठली गेली. सध्या ९ जून २०२३ पासून चौथा संच बंद ठेवण्यात आला असून पहिल्या, दुसऱ्या संचातून अगदी कमी पाणी वळवून वीजनिर्मिती करण्यात येते. त्याचवेळी नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी सर्वसाधारणपणे दोन्ही जनित्रे चालवली तर २२०० घनफूट प्रतिसेकंद इतका विसर्ग जातो आणि पूर्ण दिवसात ०.१९ टीएमसी पाणी सोडता येते. मात्र त्यातही काटकसर करून सध्या दिवसभरात एकच जनित्र चालवून नदीत १,०५० घनफूट प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे.
महाराष्ट्रासाठी गुड न्यूज! ४१ हजार कोटींची गुंतवणूक, ६७६० रोजगार मिळणार, फडणवीसांची माहिती
अद्यापही वीजमागणी उच्चांकावर

महानिर्मिती कंपनीची स्थापित वीज उत्पादन क्षमता १३ हजार १५२ मेगावॉट इतकी आहे. त्यामध्ये सर्वाधिक ९,५४० वीज ही औष्णिक क्षेत्रातील आहे. जलविद्युत क्षमता २,५८० मेगावॉट इतकी आहे. वायूआधारित ६७२ व फक्त ३५९ मेगावॉट ही सौरऊर्जा निर्मिती क्षमता आहे. उन्हाळ्यात राज्यातील वीज मागणी वाढली असताना कंपनीने जवळपास ७,८०० मेगावॉट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला होता. मात्र महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक वीज उत्पादनाने आजवर ८ हजार मेगावॉटचा टप्पा पार केलेला नाही. आता एकीकडे कोयना जलविद्युतमधील वीज उत्पादनात घट झाली असताना पावसाळा पुरता सुरू न झाल्याने राज्याची उच्चांकी वीज मागणी अद्यापही २४ हजार ते २५ हजार मेगावॉटदरम्यान कायम आहे. त्यामुळे कंपनीला येत्या दिवसांत औष्णिक वीज उत्पादन उच्चांकावर व पूर्ण क्षमतेवर न्यावे लागण्याची शक्यता आहे. महानिर्मिती कंपनीला फक्त महावितरणला वीज विक्रीची परवानगी आहे. महावितरण कंपनी एकूण मागणीच्या सरासरी २५ टक्के वीज महानिर्मितीकडून खरेदी करते.

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here