मुंबई: ‘सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव आम्ही कधीच घेतलं नव्हतं. भाजपचा प्रत्येक मंत्री या प्रकरणाबाबत बोलताना ‘युवा मंत्री’ इतकाच उल्लेख करत होता. शिवसेनेच्या नेत्यांनीच आदित्य यांच्या नावाची वाच्यता केली. ते त्यांना अडकवत आहेत,’ असा आरोप भाजपचे आमदार यांनी केला आहे.

सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी लावून धरताना भाजपकडून सातत्यानं ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याकडं बोट दाखवलं जात होतं. मुंबईतील युवा मंत्र्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी अनेकदा केला होता. नीतेश राणे, त्यांचे बंधू नीलेश राणे व वडील खासदार नारायण राणे यांनीही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला, विशेषत: शिवसेनेला घेरलं आहे. नीतेश राणे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकेची तोफ डागली. ‘महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. पण, भाजपकडून युवा मंत्री असा उल्लेख केल्यानंतर यांचंच नाव का चर्चेत आलं. अमित देशमुख, आदिती तटकरे, अस्लम शेख यांना का खुलासा करावासा वाटला नाही,’ असा प्रश्न नीतेश यांनी केला.

वाचा:

‘अनिल परब यांनीच ट्वीट करून १३ तारखेला पार्टी झाल्याची माहिती दिली होती. त्यांच्याकडं नेमकी काय माहिती आहे याचीही चौकशी व्हायला हवी. संजय राऊत हेही आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन विरोधकांना आव्हान देत आहेत. शिवसेनेचे नेते ठरवून आदित्य ठाकरेंचं नाव गोवत आहेत,’ असा आरोपही नीतेश यांनी केला. ‘शिवसेनेतही जुने विरुद्ध नवे असे वाद आहेत. त्या वादातूनच आदित्य ठाकरेंचं नाव पुढं आलं आहे,’ असंही नीतेश राणे म्हणाले.

सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार

सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची तयारीही नीतेश राणे यांनी दर्शवली आहे. ‘माझ्याकडे जी माहिती आहे. ती योग्य वेळी आणि सीबीआयच्या गरजेनुसार त्यांना देईन,’ असंही नीतेश यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here