विलास अध्यापक, बेळगाव : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रक आणि कार अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मुप्पिनमठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे बंगलोर महामार्गावर होनगा गावाजवळ हा अपघात घडला. अपघातात कार चालक आणि त्याच्या बाजूला बसलेली एक व्यक्ती जागीच ठार झाले. कारमध्ये मागे बसलेले मुप्पिनमठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

स्वामीजींना उपचारासाठी बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील शिवापूर गावातील मुप्पिनमठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी बेळगावात होणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे.
अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून कारमधून जखमी स्वामीजींना बाहेर काढण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. नंतर पोलिसांनी क्रेनने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, स्वामींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. अनेक मान्यवरांनी जिल्हा रुग्णालयात स्वामींना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली