गोवंडी येथील नरेश दफ्तरी यांची त्यांचा मित्र अजय मेनारिया याने मोहनलाल चौधरी या व्यक्तीसोबत ओळख करून दिली. पाचशे रुपयांच्या नोटांच्या बदल्यात दोन हजारांच्या दहा टक्के नोटा देणारा एक व्यापारी आहे. त्याच्याकडे दोन हजारांच्या नोटा अधिक असल्याने असा सौदा करण्यात येत असल्याचे सांगितले. या व्यवहारामध्ये पाच लाख रुपये कमिशन मिळणार असल्याने नरेश यांनीदेखील आपल्या मित्रांना याबाबत सांगितले.
आबिद या मित्राने टिळकनगर येथील व्यावसायिक हा व्यवहार करण्यास तयार आहे, असे सांगितले. त्यानुसार आबिद ५०० रुपयांच्या एक कोटीच्या नोटा घेऊन आला. नरेश यांनी त्याचा मित्र सदाफला घेऊन मोहनलाल याच्याशी संपर्क साधला. मोहनलाल याने दोन हजारांच्या नोटा घेऊन येणाऱ्या सोनू याला फोन केला. त्याने एक कोटी व्हिडीओ कॉल करून दाखविण्यास सांगितले. नरेश यांनी ही रक्कम त्याला दाखवली. पैसे आणल्याची खात्री पटल्यानंतर सोनू नरेश आणि इतरांना भेटण्यासाठी आला. त्याने एक कोटी रुपये ताब्यात घेतले आणि रक्कम योग्य असल्याची खात्री केली.
नरेश यांच्यासोबत त्यांचे मित्र हे अजय आणि मोहनलाल यांना घेऊन गोवंडी बेस्ट कॉलनीमध्ये देवाणघेवाण करण्यास गेले. पैशांचा व्यवहार सुरू असताना एक पोलीस लिहिलेली अर्टिगा कार त्या ठिकाणी आली. पोलीस लिहिलेले मास्क घातलेले चार जण कारमधून उतरले. त्यांनी सोनूला ताब्यात घेतले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्याकडील एक कोटीची रक्कम काढून घेतली. हे पाहून नरेश आणि त्यांच्या मित्रांनी घाबरून पळ काढला. त्यांना पळत असल्याचे पाहून या परिसरात गस्तीसाठी असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हटकले. नरेश यांनी सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी त्यांना याबाबत गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले.