मुंबई: लग्नाच्या भूलथापा देऊन १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २३ वर्षीय एसी मॅकेनिकला गुरुवारी अटक करण्यात आली. दादर पोलिसांनी ही कारवाई केली. तुषार दीपक जाधव असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुलीच्या काकीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिची देखभाल करण्यासाठी मुलगी या रुग्णालयात जात होती. आरोपी तुषार हा एसी दुरुस्त करण्यासाठी या रुग्णालयात जात असे. तेथे दोघांची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक शेअर केले होते. दोघांमध्ये मोबाइलवरून मेसेजच्या माध्यमातून गप्पा होत होत्या. ते दोघेही दादरच्या शिवाजी पार्कात भेटत असत. २४ फेब्रुवारी रोजी दोघेही शिवाजी पार्क चौपाटी येथे भेटले. तेथे त्याने मुलीला प्रपोझ केला. लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला.

मुलीनं त्याला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावर माझ्या बहिणीला आपल्या प्रेमाविषयी सांगितलं आहे. ती माझ्या आईवडिलांशी बोलणार आहे. त्यानंतर ते दोघे तुझ्या पालकांशी आपल्या लग्नाविषयी बोलणी करतील, अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर दोन ते तीन वेळा त्याने तिला चौपाटीवर बोलावले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. मार्चमध्ये तुषारचे अन्य मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे पीडित मुलीला समजले. त्यानंतर तिने आपल्या आईला हे प्रकरण सांगितले. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी तुषार जाधव याने वकिलामार्फत आपली बाजू मांडली आहे. हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. तक्रारदाराने अन्य एका व्यक्तीविरोधात इतर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारची तक्रार दाखल केली आहे, असे तुषारचे वकील पांडे यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here