किनवट तालुक्यातून तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची मोठ्या प्रमाणात तस्करी होतं असते. या पूर्वीही गोरक्षकांनी अनेक वेळा गोवंशाची तस्करी करणाऱ्या गाड्या पकडल्या आहेत. सोमवारी रात्री तेलंगणात लग्न समारंभासाठी गेलेल्या युवकांना बोलेरो पिकअप टेम्पोतून गोवंशाची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या युवकांनी कारमधून गाडीचा पाठलाग केला. इस्लापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी अप्पाराव पेठ परिसरात युवकांनी वाहनाला अडवले.
या वाहनामध्ये गाई, बैल, कालवड आढळून आले. विचारपूस करत असताना तस्करांनी काठ्या आणि चाकूने युवकांवर हल्ला केला. यात शेखर रामलू रापेल्ली या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर महेश कोंडलवार, ज्ञानेश्वर कार्लेवाड, विशाल मेंडेवार, विठ्ठल अनंतवार, बालाजी राऊलवाड, सूर्यकांत कार्लेवाड हे युवक गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींना नांदेड आणि किनवट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवणी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा:
युवकांवर सशस्त्र हल्ला झाल्यानंतर परिसरात एकच खळबल उडाली होती. परिसरात तणाव निर्माण झाल्याने इस्लापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सोपान रेड्डी पेंटवार यांच्या फिर्यादी वरुन इस्लापूर पोलिसांनी खूनासह विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे.
गोवंशाची मोठया प्रमाणात तस्करी:
किनवट तालुक्यातून तेलंगणा राज्यात मोठया प्रमाणात गोवंशाची तस्करी केली जाते. यावेळी अनेक वेळा गोरक्षकांनी तस्करी करणारी वाहने पकडली होते. तस्करी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तरी देखील गोवंशाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु आहे.