वाशिम: पिढी जात असलेले १८ विश्व दारिद्र्य. पुण्यात बांधकाम मजूर म्हणून केलेलं काम. पोटाला चिमटा घेऊन मुलाच्या शिक्षणासाठी केलेली धडपड या सगळ्यांचं आता चीज झालंय. वाशिम जिल्ह्यातील पेडगावच्या विमल आणि गणेश सोनोने या दांपत्याचा मुलगा आता ब्रिटनला शिक्षणासाठी जातोय. त्याला वेगवेगळ्या तीन विद्यापीठाकडून तब्बल दीड कोटी रुपयांच्या स्कॉलरशिप मंजूर झाल्यात. वैभव विमल गणेश सोनोने असे या हरहुन्नरी तरुणाचं नाव आहे.

सोनोने कुटुंब हे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने झपाटलेलं, एक वेळ घरात खायलाही काही नसले तरी चालेल. मात्र, मुलांच्या अभ्यासासाठी पुस्तकं कमी पडू द्यायची नाहीत, हेच वैभवच्या आई वडिलांचे ध्येय. वैभवनेही अभ्यासात कधी कुचराई केली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आता वैभवला चिवनिंग अवॉर्ड ही शिष्यवृत्ती युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये पर्यावरण व विकास याविषयी अभ्यासासाठी तर कॉमनवेल्थ शेयर्ड कॉलरशिप युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स मध्येच अभ्यासासाठी आणि कॉमनवेल्थ शेयर्ड कॉलरशिप युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंजिला यामध्ये शेती आणि ग्रामीण विकास याविषयी अभ्यासासाठी मंजूर झाली आहे. तो लवकरच उच्चशिक्षणासाठी ब्रिटनला जाणार आहे.
वैभवचे सुरुवातीचे शिक्षण हे संत सखाराम महाराज संस्थान लोणी यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या आश्रम शाळेत झाले. तिथल्या शिक्षकांनी वैभव मधलं टॅलेंट हेरलं आणि त्याच्यासाठी शाळेच्या ग्रंथालयाची दारं २४ तास उघडी केली. तो तासानतास ग्रंथालयात घालवायचा. वाचनातून त्याच्या सामाजिक जाणीवा जागृत झाल्या आणि त्याने पुढचं आयुष्य आर्थिक, सामाजिक दुर्बलतेने मागासलेल्यांसाठी घालवण्याचे निश्चित केलं. पुढे त्याने उच्च शिक्षणासाठी पुणे गाठलं आणि फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्रात बीए केलं. मात्र, यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला.

साडेआठ कोटींची चोरी करुन देवदर्शनाला निघाली, पण १० रुपयांच्या फ्रूटीचं आमिष अन् खेळ खल्लास
दोन वेळेच्या जेवणाची सोय नव्हती

घरची परिस्थिती इतकी हालाखीची होती की पुण्यासारख्या शहरात दोन वेळच्या जेवणाची सोय होणंही शक्य नव्हतं. काही दिवस त्याने मित्रांकडे, नातेवाईकांकडे घालवले आणि नंतर वस्तीगृहात प्रवेश मिळवला. मात्र, जेवणाचा प्रश्न होताच. मुलगा उपाशीपोटी झोपतोय हे समजल्यावर आईने आपलं सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र आणि पायातील चांदीचे जोडवे मोडले आणि त्याला जेवणासाठी पैसे पाठवले. ज्यातून दोन-तीन महिन्याची त्याची सोय झाली पण पुढचा प्रश्न होताच.

शिक्षकांना जेव्हा ही त्याची परिस्थिती समजली तेव्हा त्यांनी काही दिवस त्याच्या जेवनाची सोय केली. पण, वैभवला खरा मदतीचा हात मिळाला तो ठाण्याच्या विद्यादान सहाय्यक मंडळाकडून. नावाप्रमाणेच शिक्षण घेणाऱ्यांना मदत करणाऱ्या ह्या संस्थेने वैभवच्या जेवणाचा खर्च उचलला आणि त्याचं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालं. पुढे वैभवने बेंगलोर गाठलं आणि तेथील अजीम प्रेमजी विद्यापीठातून एम ए डेव्हलपमेंट हे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेत असतानाच नोकरी करून शिक्षण घ्यावं हे अनेकांनी वैभवला सुचवलं होतं. त्याने तसा विचार वडिलांकडे बोलून दाखवला. मात्र, वडिलांनी त्याला ठामपणे आपल्या शिक्षणावर लक्ष देण्यासाठी सांगितलं. वडिलांचे म्हणणं होतं आपल्या घरातील अठरा विश्व दारिद्र्य हे पिढ्यानपिढ्या आम्ही सोसतोय पुढचे चार-पाच वर्ष यात आणखी बदल झाला नाही तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र, तू आपल्या शिक्षणावरचे लक्ष विचलित होऊ देऊ नको.

वैभवने गावाचं रुप पालटलं

सामाजिक विषयात शिक्षण घेतलेल्या वैभवने प्रत्यक्षात काम करायला सुरुवात केली आणि त्याला साथ मिळाली प्रदान या संस्थेची ही संस्था देशभरातील अति मागास भागात आदिवासी गोरगरिबांच्या कल्याणासाठी कार्य करते. या संस्थेत वैभव सध्या मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील धमनपाणी या अतिदुर्गम गावात आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य करत आहे. वैभव या गावात गेल्यापासून या गावचं रूपच पालटलं आहे. आधी या गावात पिण्यासाठी पाणी नव्हतं, शेती ही कोरडवाहू होती. रोजगार नसल्याने लोक मोठ्या प्रमाणात गाव सोडून शहरात पलायन करायचे. आता मात्र वैभव आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नाने गाव पुन्हा समृद्ध होत आहे.

वैभवने रोजगार हमीच्या कामात होणारा भ्रष्टाचार थांबवलाय, जलसंधारणाची विविध कामे करून शेती सिंचनाखाली आणली आहे. आता लोक दुबार-तिबार पिके घेतात आणि त्यामुळे त्यांचं पलायन सुद्धा थांबले. या गावात कार्य करताना ग्वैभाव वर जीवघेणे हल्ले सुधा झाले. मात्र, त्याने गावकऱ्यांच्या विकासाचे कार्य सोडले नाही.

गावी असताना आपले आई- वडील आणि समाजाचे दुःख बघितलेल्या वैभवने अशाच वंचित, दुर्लक्षित लोकांसाठी कार्य करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतःचे आयुष्य वाहून घेतले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तो आता ब्रिटनत शिक्षण घेणार आहे. वैभवला मंजूर झालेली स्कॉलरशिप मिळवण्यासाठी एकलव्य या संस्थेच्या ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम या अंतर्गत मोठी मदत झाली आहे.

वैभव परदेशी शिक्षणासाठी जात असल्याने अत्यंत गरिबीत दिवस काढलेल्या वैभवच्या आई वडिलांना त्याचा सार्थ अभिमान वाटतोय. याबाबत वैभवची आई विमल सोनोने सांगतात, “मुलाने शिकावं, मोठ व्हावं यासाठी आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न केले. हलाकीचे दिवस सोसले पण मुलांचं शिक्षण थांबू दिलं नाही”.

“आता बाबासाहेबांप्रमाणेच माझा मुलगाही ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जातोय याचा आम्हाला खूप अभिमान आहे, येत्या काळात ग्रामीण भागातील आणि वंचित घटकांमधील लेकरांनी असेच पुढे जावे”, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

इंदापूरच्या शेतकऱ्याचा स्वॅग; चक्क साडे १२ लाखाच्या थारने शेत नांगरलं, व्हिडिओ व्हायरल

वैभवने मागील वर्षी त्याच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या स्नेहल सोबत आंतरजातीय विवाह केलाय. सध्या ती अझीम प्रेमजी फाउंडेशनमध्ये काम करते. मध्य प्रदेशातील आदिवासी भागात शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी सरकारी शाळामधील शिक्षकांसोबत काम करत आहे. तिने सुद्धा एकलव्य संस्थेमार्फत ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम अंतर्गत स्कॉलरशिप साठी प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे तीही आता चेवनिंग स्कॉलरशिपच्या प्रतीक्षा यादीत आहे. वैभवला विश्वास आहे की ती सुद्धा लवकरच या शिष्यवृत्तीसाठी पात्र होईल आणि दोघेही ब्रिटनमध्ये पुढचं उच्च शिक्षण घेऊन पुन्हा भारतात येऊन सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक दृष्टया मागाससेल्या घटकांसाठी आयुष्यभर कार्य करतील.
तसेच, चेवनिंग स्कॉलर राजू केंद्रे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या एकलव्य मूव्हमेंटच्या ग्लोबल स्कॉलर प्रोग्रामचे वैभवने आभार मानले आहेत. येत्या काळात असे अनेक एकलव्य घड्विण्याचा संकल्प घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here