उदयनराजेंकडून भूमिपूजनाच्या ठिकाणी असलेल्या साहित्याची तोडफोड करण्यात आल्यानंतर तिथे दाखल झालेल्या शिवेंद्रराजेंनी पोलिसांना आपली भूमिका सांगितली आणि नंतर नियोजित पद्धतीने भूमिपूजनही केले. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्तेही आमने-सामने आले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
सातारा बाजार समितीत आमदार शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता आल्यानंतर निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती करण्यासाठी खिंडवाडी येथे साडेपंधरा एकरवर नवीन बाजार समितीची इमारत उभी करण्यात येत आहे. या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज सकाळी शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार होता. त्यासाठी खिंडवाडी येथे जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र अशातच स्थानिक नागरिकांसह उदयनराजे भोसले स्वतः दाखल झाले आणि आक्रमक भूमिका घेत तिथे असणाऱ्या साहित्याची मशीनच्या साहाय्याने मोडतोड सुरू केली.
उदयनराजे काय म्हणाले?
साहित्याची मोडतोड सुरू झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उदयनराजे पोलिसांनी म्हणाले की, ‘सदरील जागा माझी असून मालक मी आहे. त्यामुळे माझे शेड मी तोडल्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझ्या जागेत शेड म्हणजे ते माझेच आहे. माझ्या जागेत एखाद्याने काही केले तर ती वस्तू कायद्याने माझीच होणार आहे,’ असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.