मिळालेल्या माहितीनुसार, आंबा येथील गवळी गल्लीत राहणारे सुखदेव माणिक जाधव यांचा दूध आणि दही विक्रीचा व्यवसाय आहे. या कामात त्यांची पत्नी मंगल जाधव या पतीला मदत करतात.ते आपल्या परिवारासह राहतात.त्यांच्या घरी दोन शेळ्या आणि चार म्हशी आहेत.बाजूच्या गल्लीमध्ये सुखदेव जाधव यांचे दोन भाऊ पांडुरंग आणि मुगाजी हे राहतात. सुखदेव जाधव हे रोज परतुर येथे दूध दही विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुखदेव म्हशीचे दूध काढत असताना पुतण्या कैलास उर्फ पिंट्या मुंगाजी जाधव तिथे आला आणि बोकड बांधण्याच्या कारणावरून शिवीगाळ करू लागला. तेव्हा गावातील काही लोकांनी वाद मिटविला. नंतर सुखदेव व त्यांची पत्नी मंगल हे दोघे नेहमीप्रमाणे परतूर येथे दूध, दही विक्री करण्यासाठी गेले.
सुखदेव हे आंबा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या मुलीस घेऊन ११ वाजेच्या सुमारास घरी परतले. घरी आल्यानंतर कैलास जाधव आणि त्याचा मामा बंडू सिध्दू आप्पा इकलवारे (रा. आष्टी) हे दोघे सुखदेव जाधव यांच्याकडे आले. बंडू याने माझ्या भाच्याला का शिवीगाळ केली असे म्हणत जाधव यांना लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी सुखदेव जाधव हे घरातून पळून तळ्याकडे गेले. त्याच वेळी जाधव यांची पत्नी घराकडे येत असताना दिसली. त्यावेळी आंबा गावाजवळ कैलास मुगाजी जाधव आणि त्याचा मामा बंडू सिध्दू आप्पा इकलवारे या दोघांनी मंगलबाई यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत मंगलाबाई जाधव यांचा मृत्यू झाला.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच परतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आला.या प्रकरणी सुखदेव जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित जाधव व त्याचा मामा बंडू आप्पा इकलवारे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दुसरा फरार आहे.
या घटनेची माहिती मिळताच परतूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बुधवंत आणि पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कैलास भुगाजी जाधव याला अटक केली आहे तर बंडू एकलवारे याचा पोलीस शोध घेत आहेत. सुखदेव माणिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतुर पोलिसांनी भांदवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.पुढील तपास उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करीत आहेत.