कुणाल लोंढे, पनवेल: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयच्या पथकाकडून या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी केली जात आहे. मात्र, केवळ नामसाधर्म्यामुळे पनवेलच्या डॉक्टरांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. सुशांतचे अनेक चाहते या डॉक्टरांना फोन करून सुशांतचा शवविच्छेदन अहवाल खोटा दिला असल्याचा आरोप त्यांच्यावर करत आहेत. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी शहर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

पनवेल शहरातील नेत्रचिकित्सक म्हणून परिचित असलेले अनेक वर्षांपासून येथे रुग्णांना सेवा देत आहेत. डॉ. इंगळे यांना गेल्या आठवड्यापासून काही अनोळखी व्यक्तींकडून मोबाइलवर फोन येत आहेत. सशांतसिंहचा शवविच्छेदन अहवाल तुम्ही खोटा बनविला आहे, माझ्याकडे पुरावे आहेत. हे तुम्ही चुकीचे केले आहे, असा आरोप फोनवर बोलणाऱ्या व्यक्ती करत आहेत. तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर पनवेलचे डॉ. संदीप इंगळे हे नेत्ररोगतज्ज्ञ असताना त्यांनी सुशांतसिंहचे शवविच्छेदन केले कसे, असे प्रश्न विचारणारे चाहत्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत.

चार ते पाच फोन आल्यानंतर डॉ. इंगळे यांनी या प्रकाराची माहिती घेतली. शवविच्छेदन अहवालात डॉ. संदीप इंगळे नावाच्या डॉक्टरांचा उल्लेख असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, नेमके ते डॉक्टर कोण हे माहीत नसणाऱ्या सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांकडून मला नाहक त्रास होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच या प्रकरणी पनवेलच्या डॉक्टर इंगळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली. पनवेल शहर पोलिसांनी सुरुवातीला ही बाब गांभीर्याने घेतली नाही. इंगळे यांच्या घराचा पत्ता, क्लिनिकचा पत्ता सांगून समाजमाध्यमांवर त्यांची बदनामी केली जात असताना, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. त्यामुळे डॉ. इंगळे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची माहिती तक्रार अर्जाद्वारे दिली आहे. अद्यापही पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतलेली नाही. सुशांतसिंह प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना केवळ नामसाधर्म्यामुळे मला सुशांतच्या समर्थकांचे फोन येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर आरोप केले जात आहेत. पण माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. सुशांतच्या मृतदेहाचे विच्छेदन करणारा डॉक्टर मी नाही. त्यामुळे मला कोणीही फोन करू नये, असे आवाहन डॉ. इंगळे यांनी केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here