श्रीशैलम: राज्यातील श्रीशेलम जलविद्युत संयंत्राला () भीषण आग लागून एकूण ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने अडकलेल्या लोकांना वाचवत असताना या आगीतून एकूण ९ जणांचे मृतदेह बाहेर काढले. मृत्युमुखी पडलेले लोक हायड्रोइलेक्ट्रीक प्लांटमध्ये अडकले होते. गुरुवारी रात्री उशिरा ही आग लागली. या आगीत एका सहाय्यक इंजीनियरचा देखील मृत्यू झाल्याची माहिती नगरकुरनूलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले. ही आग श्री शैलम जलविद्युत संयंत्राच्या एका हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटमध्ये लागली. आग लागल्याची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या १० जणांचे प्राण वाचवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेनंतर ट्विट केले आहे. श्रीशैलम जलविद्युत संयंत्राला आग लागणे हे दुर्दैवी आहे. अशा दु:खद प्रसंगी माझ्या सहवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरच बरे होतील अशी मला आशा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गुरुवारी रात्री १०.३० वाजता ही आग लागली. त्या वेळी एकूण १९ लोक कामावर होते. यां पैकी १० लोकांना वाचवण्यात यश आले असून एक विभागीय अभियंता, चार सहाय्यक अभियंते, दोन कनिष्ठ प्लांट अटंडंट आणि दोन इतर लोक या आगीत अडकले. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र ९ लोकांचा प्राण वाचवण्यात बचाव पथकाला अपयश आले. श्रीशैलम जलविद्युत संयंत्र तेलंगणमधील आंध्र प्रदेशच्या सीमेलगत आहे. तेथील आगीनंतरची परिस्थिती पाहता तातडीने NDRF ला देखील पाचारण करण्यात आले.

कृष्णा नदीवर निर्माण करण्यात आलेल्या हे पॉवर स्टेशन हैदराबादपासून सुमारे २०० किमी दूर आहे. हे पॉवर स्टेशन तेलंगण राज्य पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन (जेनको) तर्फे संचलित केले जाते. या संयंत्रात एकूण ६ भाग असून त्यांची एकूण क्षमता ९०० मेगावॅट वीज उत्पादन करण्याची आहे. इथे चांगला पाऊस झाल्यानंतर या संयंत्रात वीज निर्मितीचे काम जोरात सुरू होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here