नुकत्याच मुंबईत झालेल्या समारंभात शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अजित पवार यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहणार आहेत, असे त्यांना सांगितले गेल्यानेच त्यांनी तशी भूमिका घेतली होती असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. दोन दिवसांनी शरद पवार यांनी निर्णय फिरवल्यानंतर अजित पवार यांना पक्षामध्ये जाणीवपूर्वक खलनायक ठरवले जाऊ लागले. त्यामुळे अजित पवार व त्यांचे समर्थक अस्वस्थ होतेच.
दिल्लीतील पक्षाच्या अधिवेशनात सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करून महाराष्ट्राची जबाबदारी दिल्यानंतर तर अजित पवार विरोधकांना अधिकच बळ मिळाले होते. त्यामुळे अजित पवार समर्थकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर राग धुमसत होता. अखेर समर्थकांच्या या रागाला अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात सर्व प्रमुख नेत्यांच्या समोरच वाट मोकळी करून दिल्याने अजित पवार विरोधी गटाची मोठीच पंचाईत झाली आहे.
दरम्यान, जयंत पाटील हे मागील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येकी तीन वर्षांनंतर प्रदेशाध्यक्ष हे पद बदलण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या आजच्या वक्तव्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आक्रमक भाषण केले. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर आपल्या मनातील सगळी खदखद बोलून दाखवली. अजित पवारांचा हा आक्रमक अवतार पाहता त्यांनी जयंत पाटील व पक्षातील अन्य काही नेत्यांना त्यांनी धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘मला विरोधी पक्षनेतेपदात कधीच रस नव्हता. पक्षातील आमदारांच्या स्वाक्षऱ्या, नेतेमंडळींच्या आग्रहाखातर मी विरोधी पक्षनेता झालो. वर्षभर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना मी कडक वागत नाही, असे काहींचे म्हणणे आहे. आता कडक वागायचे म्हणजे त्यांची गचांडी धरायची का? त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मला मुक्त केल्यानंतर संघटनेची कोणतीही जबाबदारी द्यावी. त्या पदाला योग्य न्याय मी मिळवून देईन. अर्थात हा नेतेमंडळींचा अधिकार आहे. बाकी अनेकजण वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात. मी आज माझी इच्छा व्यक्त केली आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडलेली आहे’, असे अजित पवार म्हणाले.