Ganpat Gaikwad : कर्जत काटई राज्य महामार्गावर वसार गावाजवळील जागेच्या भूसंपादनाचा आणि नुकसान भरपाईचा वाद एमआयडीसी आणि शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे. या वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी गणपत गायकवाड गेले होते. त्यावेळी एमआयडीसीच्या सुरक्षा रक्षकावर ते संताले.
हायलाइट्स:
- आमदार गणपत गायकवाड संतापले
- चित्रीकरण करणाऱ्या सुरक्षारक्षकाला खडे बोल
- वसार गावाजवळील घटना
एमआयडीसीच्या सुरक्षा रक्षकाकडून चित्रीकरण, आमदार संतापले
आमदार गणपत गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु असताना एमआयडीसीचा सुरक्षारक्षक गुपचूप त्यांच्या संभाषणाचं चित्रीकरण करत होता. ही बाब गणपत गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी सुरक्षारक्षकाला खडे बोल सुनावले. गणपत गायकवाड यांनी सुरक्षारक्षकाला चित्रीकरणाबद्दल जाब विचारला. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना गणपत गायकवाड यांनी एमआयडीसीकडे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अनेकदा मागणी करुन ते ऐकत नाहीत. पहिल्यांदा भरपाई नंतर काम अशी भूमिका घेत असताना सुरक्षारक्षक गुप्तपणे रेकॉर्डिग करत होता. त्यामुळं राग आल्यानं चुकीचे शब्द वापरल्याचं गणपत गायकवाड म्हणाले.
कर्जत-काटई राज्य महामार्गावर अंबरनाथहून काटईच्या दिशेने जाणाऱ्या राज्य महामार्गाची एकेरी मार्गिका वसार गावाजवळ गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकरी आणि एमआयडीसीमधील भूसंपादनाच्या वादातून बंद आहे. स्थानिक शेतकरी लहू येवले यांना गेले पन्नास वर्षे एमआयडीसीकडून भूसंपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्याने ११ एप्रिल त्यांनी अंबरनाथहून काटईला जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या एकेरी मार्गाचा काही भाग वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.
अखेर तोंडावर आलेला पावसाळा पाहता बुधवारी सकाळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात एमआयडीसी अधिकारी बंद रस्त्याचा भाग खुला करण्यासाठी पोहोचले. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी स्थानिक आमदार गणपत गायकवाड हेही उपस्थित होते. मात्र, गेले अडीच महिने एमआयडीसीकडून कोणतेही सर्वेक्षण करण्यात आले नाही. या समस्येवर कुठलाही ठोस तोडगा न काढता थेट रस्ता सुरू करण्यासाठी आलेल्या एमआयडीसी प्रशासनावर येवले यांनी तीव्र रोष व्यक्त केला. संबंधितांमध्ये राज्य महामार्गावरच चोख पोलिस बंदोबस्तात तीन तास चर्चा झाली, मात्र आधी भूसंपादनाच्या वादावर तोडगा काढा, त्यानंतरच रस्त्यासाठी जागा देऊ, या भूमिकेवर येवले कायम आहेत. त्यामुळे तीन तासाच्या चर्चेनंतरही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना रस्ता खुला न करताच माघारी फिरावे लागले.
पोलिस बघ्यांच्या भूमिकेत
या भागात रस्ता सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी, एमआयडीसीचे अधिकारी, आमदारांचे पदाधिकारी आणि पोलिस यांची वाहने आणि उपस्थितांच्या गर्दीमुळे राज्य महामार्गावर तब्बल तीन तास वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तर यावेळी ५० पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता. मात्र वाहतूककोंडी सोडवण्याऐवजी पोलिस बघ्याच्या भूमिकेत असल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.