‘बेकायदेशीर’ ठरवत बृहन्मुंबई महापालिकेने गुरुवारी दुपारी शिवसेनेच्या (यूबीटी) शाखेवर हातोडा चालवला आहे. ही शाखा वांद्रे पूर्वेकडील निर्मल नगर परिसरात होती. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वांद्रे पूर्व परिसरात ठाकरे गटाच्या वतीने बांधलेल्या कार्यालयावर बुलडोझर फिरवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर ही शाखा आहे.
ठाकरे गटाच्या वतीने उभारण्यात आलेले ऑटो ड्रायव्हर्स वेल्फेअर असोसिएशनचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईच्या दरम्याने पालिका अधिकारी उपस्थित होत. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. शाखेवर कारवाई होताच अनेक शिवसैनिकांनी तेथे गर्दी केल्याचे दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कार्यालय जवळपास 40 ते 50 वर्षे जुने आहे. तसेच वॉर्ड क्रमांक 96 जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचे हे कार्यालय आहे. या शाखेचे शाखा प्रमुख फारूख शेख आहेत. दरम्यान जी शाखा पाडली जात आहे. ती खुप जुनी आहे. 1995 च्या झोपड्यादेखील अधिकृत करण्यात आल्या आहेत. मात्र 40 वर्षे जुनी शाखा अनधिकृत आहे, असं महापालिका कसं म्हणू शकते?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तसेच हे सर्व सुडबुद्धीने करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, या कारवाईबाबत कोणतीही नोटीस दिली नाही. मला शिवसेनेने ऑफर दिली होती. ती मी नाकारली असल्याने महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र मी उद्धव ठाकरेंना कधीही सोडणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत राहिन, अशी प्रतिक्रिया हाजी हलीम खान यांनी दिली आहे.